डोंबिवली: थकबाकीपोटी खंडित केलेला वीजपुरवठा सुरू आढळल्याने कारवाई करणाऱ्या पथकातील बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना डोंबिवली पूर्व भागातील घरडा सर्कल जवळील आजदे गाव येथे सोमवारी घडली. पथकातील महिला विद्युत सहाय्यकालाही शिवीगाळ करण्यात आली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागेश धर्मदास गमरे (समर्थ दर्शन बिल्डिंग, बी-४०३, हनुमान मंदिराजवळ, आजदे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. महिला विद्युत सहायक विजया भुयारकर या बाह्यस्त्रोत कर्मचारी आकाश गिरी यांच्यासह आजदे परिसरात तपासणीचे काम करत होत्या. रघुनाथ बाळकु आवटे या ग्राहकाचा वीजपुरवठा थकबाकीपोटी खंडित करण्यात आला होता. मात्र, याठिकाणी परस्पर वीज वाहिनी जोडून वीजपुरवठा सुरू असल्याचे आढळून आले.
हेही वाचा >>> डोंबिवली एमआयडीसीतील रहिवासी, उद्योजक धुळीने हैराण
त्यानुसार कारवाई करताना भाडेकरू असणाऱ्या आरोपी गमरे याने बाह्यस्त्रोत कर्मचारी आकाश गिरी यांना मारहाण केली व महिला विद्युत सहायक भुयारकर यांना शिविगाळ केली. भुयारकर यांच्या तक्रारीवरुन मानपाडा पोलिसांनी गमरे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार आहे. महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण व दमदाटीच्या गुन्ह्यात जबर शिक्षेची तरतूद आहे. महावितरण कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा न आणता सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.