लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघाच्या जागेवर महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नसला तरी येथील महायुतीच्या नेत्यांनी निवडणुक प्रचार नियोजनासाठी संयुक्त समिती गठीत केली आहे. निवडणुक सभा, बैठका, पोस्टर मजकूर तसेच इतर कामांचे नियोजन ही समिती करणार असून या समितीने आज, बुधवारी महायुतीचा पहिला मेळावा ठाण्यात आयोजित केला आहे. यानिमित्ताने उमेदवार जाहीर नाही पण, निवडणुक समिती जाहीर, अशी चर्चा रंगली आहे.

ठाणे जिल्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही जागांच्या निवडणुका मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेची मानली जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने राजन विचारे यांना ठाणे लोकसभा मतदार संघाची उमेदवारी जाहीर केली असली तरी महायुतीकडून अद्याप उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही. या जागेवर भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून दावे करण्यात येत असून यामुळे या जागेचा तिढा अद्याप सुटू शकलेला नाही. ही जागा कोणत्या पक्षाला मिळणार आणि उमेदवार कोण असेल, याविषयीची उत्स्कूता वाढली आहे. शिवसेनेने दबाब वाढविण्यासाठी बैठकांचा सपाटा लावला असून त्यात पदाधिकारी ही जागा शिवसेनेलाच मिळावी असा सूर लावत आहेत. असे चित्र असतानाच, ठाण्यातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी या महायुतीच्या नेत्यांनी मंगळवारी शहनाई हॉलमध्ये एक संयुक्त बैठक आयोजित केली होती.

आणखी वाचा-डोंबिवलीत रस्ते अडवून बेकायदा गाळ्यांची उभारणी, ग प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांकडून नोटीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या आदेशानुसार ही बैठक घेण्यात आल्याचे सुत्रांकडून समजते. या बैठकीला शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक, भाजपचे आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, गीता जैन, माजी खासदार संजीव नाईक, संदीप नाईक, शहर अध्यक्ष संजय वाघुले आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे, नजीब मुल्ला, प्रभाकर सावंत व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत निवडणुक प्रचाराचे नियोजन करण्यासाठी संयुक्त समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला. या समितीमध्ये पक्षाचे आमदार, जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारी यांचा समावेश आहे. निवडणुक सभा, बैठका, पोस्टर मजकूर तसेच इतर कामांचे नियोजन ही समिती करणार असून या समितीने आज, बुधवारी महायुतीचा पहिला मेळावा ठाण्यात आयोजित केला आहे. तसेच ४ एप्रिल रोजी मिरा भाईंदर आणि १० एप्रिल रोजी नवी मुंबईला महायुतीचा मेळावा घेण्याचे बैठकीत ठरले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahayuti candidate is not announced but election committee is announced mrj