कल्याण – माजी शिंदे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी कल्याण पूर्व भागात खासदार डाॅक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण शहरात बाहुबली असा खासदार शिंदे यांचा उल्लेख करत त्यांना बॅनरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. शहरातील हे बाहुबलीचे बॅनर नागरिक, राजकीय मंडळींच्या चर्चेचे विषय ठरले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष म्हणजे महेश गायकवाड यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह कोणत्याही प्रकारचे राजकीय वितुष्ट न ठेवता खासदार शिंदे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांंना हारतुरे देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या घडामोडींवरून महेश गायकवाड लवकरच शिंदे सेनेत परत येण्याची चिन्हे असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

कल्याण पूर्वेत भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यात विविध विषयांवरून वाद सुरू होते. अखेर या वादातून आमदार गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार करून त्यांना गंभीर जखमी केले होते. या विषयावरून कल्याण पूर्वेत भाजप आणि शिंदे शिवसेनेत मोठी दरी पडली होती. भाजपने आमदार गणपत गायकवाड यांना उघडपणे समर्थन दिले होते. तर शिवसैनिक महेश गायकवाड यांच्या पाठीशी होते.

राज्यात भाजप, शिंदे शिवसेनेचे सरकार आणि कल्याण पूर्वेत भाजप, शिंदे शिवसेनेत दरी निर्माण झाल्याने ही दरी बुजविण्यासाठी दोन्ही नेत्यांची दमछाक होत होती. तरीही महेश गायकवाड यांना पडद्यामागून शिंदे शिवसेनेतील एक बलदंड शक्ती पाठबळ देत असल्याने ते एकाकी भाजप विरुध्द लढत असल्याची चर्चा होती. कोणत्याही परिस्थितीत आमदार गणपत गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असे महेश यांच्यासह त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

कल्याण पूर्वेत भाजपने आमदार गणपत गायकवाड यांचे घर सोडून कोणीही उमेदवार सोडून विधानसभेसाठी दिला तर आपण त्याचे काम करणार, अशी भूमिका महेश गायकवाड यांनी घेतली होती. भाजपने आमदार गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली. महेश यांनी शिंंदे शिवसेनेत बंडखोरी करून सुलभा गायकवाड यांच्या विरुध्द उमेदवारी अर्ज भरला. महायुतीत बंड दिसू लागल्याने शिंदे शिवसेनेने महेश यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. तरीही महेश गायकवाड यांनी एकाकी लढत देत सुलभा गायकवाड यांच्या प्रचारात जेरीस आणले होते. यामागे ठाणेदाराची शक्तीच असल्याची चर्चा होती.

काही महिन्यांपासून शिंदे शिवसेनेतून बाहेर पडलेले नाराज पुन्हा शिंदे शिवसेनेत येण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर महेश गायकवाड यांनी खासदार शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुभेच्छांच्यानिमित्ताने दोघांमधील अंतर कमी केल्याने महेश यांचा शिंदे सेनेतील मार्ग पालिका निवडणुकीपूर्वी होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.