लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंबरनाथ : ‘गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाड यांचे नाव घेऊ नको नाहीतर तुझा बाबा सिद्दिकी करू’ असे धमकी देणारे पत्र अंबरनाथ शहरात एका लग्नकार्यात आले असता आपल्याला एका तरुणाने दिले, असा आरोप महेश गायकवाड यांनी केला आहे. गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगरच्या पोलिस ठाण्यात गोळीबार केला होता. याप्रकरणी गणपत गायकवाड सध्या तुरुंगात आहे.

याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात महेश गायकवाड यांनी तक्रार दिली आहे. महेश गायकवाड शिवसेनेचे पदाधिकारी होते. मात्र विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवल्यानंतर ते पक्षापासून अधिकृतरित्या दूर आहेत. मात्र अनेक कार्यक्रमांमध्ये महेश गायकवाड शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना भेटताना दिसतात. काही महिन्यांपूर्वी एका प्रकरणात उल्हासनगरच्या हिल लाइन पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक दालनात बसलेल्या तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी अचानक शिवसेनेचे महेश गायकवाड यांच्यावर बेछूट गोळीबार केला होता. या घटनेने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. महायुतीचा दोन पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या या प्रकारामुळे राज्यभरात महायुतीची नाचक्की झाली होती. या गंभीर जखमी झालेल्या महेश गायकवाड यांच्यावर विविध शस्त्रक्रिया झाल्या. त्यानंतर महेश गायकवाड बरे झाले होते.

या घटनेनंतर गणपत गायकवाड हे तुरुंगात आहेत. त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आल्या. त्या निवडणुकीत महेश गायकवाड यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. तेव्हापासून ते शिवसेना पक्षातून अधिकृतपणे दूर होते. याच काळात काही दिवसांपूर्वी गणपत गायकवाड यांचे पुत्र वैभव गायकवाड यांना या गोळीबार प्रकरणात दिलासा मिळाला. मात्र या गोष्टीवर महेश गायकवाड यांनी आक्षेप घेतला होता.

शनिवारी एका लग्न सोहळ्यानिमित्त महेश गायकवाड हे अंबरनाथ येथील आनंद नगर भागात आले होते. त्यावेळी एका तरुणाने त्यांच्या हातात एक लिफाफा दिला. ज्यात महेश गायकवाड यांना हिंदी भाषेतून धमकी वजा इशारा देण्यात आला होता. ‘गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाड यांचे नाव घेऊ नको नाहीतर तुझा बाबा सिद्दिकी करू’, असा मजकूर त्यात लिहिण्यात आला होता अशी माहिती महेश गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली. याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

मात्र याबाबत बोलताना महेश गायकवाड यांनी गंभीर दावा केला आहे. धमकी पत्राचा कागद जेलमध्ये वापरला जात असल्याचा महेश गायकवाड यांचा दावा आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.