ठाणे : घोडबंदर येथील कासारवडवली भागात ३ लाख रुपयांच्या दागिने चोरी प्रकरणी कासारवडवली पोलिसांनी मोलकरीणला अटक केली आहे. मेघा वीर (३४) असे अटकेत असलेल्या महिलेचे नाव असून पोलिसांनी तिच्याकडून चोरलेले ३ लाख ५ हजार रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.
कासारवडवली येथील डि-मार्ड परिसरात राहणाऱ्या प्रशांती मल्लीक यांच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांची काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती.
याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला असता, घरातील मोलकरीण मेघा वीर ही गायब असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी मेघाचा शोध घेऊन तिला अटक केली. तिच्याकडून चोरलेले ३ लाख ५ हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.