कल्याण: कल्याण पूर्वेतील म्हसोबा चौक भागात राहणाऱ्या एका कुटुंबाच्या घरातील सोन्याचा एक लाख ७६ हजार रुपयांचा ऐवज याच घरात गृहसेविका म्हणून काम करणाऱ्या महिलेने लांबविला असल्याचा संशय व्यक्त करुन, कुटुंबीयांनी गृहसेविके विरुध्द कोळसेवाडी पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल केला. हेमलता राजेश डोळस (रा. दत्त काॅलनी, कोळसेवाडी, कल्याण पूर्व) असे गुन्ह्यातील संशयीत महिलेचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी सांगितले, रोमा सूर्यवंशी या खासगी नोकरी करतात. त्या कल्याण पूर्वेतील म्हसोबा चौकातील पोटे सोसायटीत राहतात. सासू, पती, मुलगा असे त्यांचे कुटुंब आहे. रोमा, त्यांचे पती नियमित कामाला जातात. मुलगा शाळेत जातो. वृध्द सासू घरात असते. रोमा यांच्या घरात हेमलता या मोलकरीण म्हणून काम करतात. गेल्या पंधरा दिवसापूर्वी रोमा यांनी घरातील कपाटात ठेवलेली दागिन्यांची पेटी पाहिली. त्यात एक लाख ७६ हजार रुपयांचा सोन्याचा इतर किमती ऐवज नव्हता. चोरी लक्षात येऊ नये म्हणून सोन्याचा शिक्का, चांदीचे दागिने पेटीत ठेऊन देण्यात आले होते.

हेही वाचा : ठाण्याहून भिवंडीकडे निघालेल्या एसटी बसला आग; चालकाच्या सतर्कतेमुळे ७० प्रवाशी बचावले

रोमा यांनी पती, सासु, मुलाकडे दागिने पेटीला हात लावला का म्हणून विचारणा केली. त्यांनी नकार दिला. कपाटाची चावी पत्नी, पतीकडे असुनही कपाट उघडले कोणी. घरात कोठेही चोरी झाल्याची चिन्हे नाहीत. सासुबाई दिवसभर घरात असतात. चोरी झाली नसताना कपाटातील दागिने चोरीला गेले कसे, याचा तपास सुरू असताना, रोमा यांनी मोलकरणीकडे याविषयी चौकशी केली. तिने नकार दिला. परंतु, रोमा यांनी मोलकरीण हेमलतावर या चोरी विषयी संशय घेऊन कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रारदार रोमा, पती सारंग कामावर गेले. सासुबाई मुलाला शाळेत सोडायला गेल्यानंतर मोलकरणीने कपाट धारदार वस्तूने उघडून तिने कपाटातील दागिने चोरल्याचा संशय पोलीस ठाण्यातील तक्रारीत व्यक्त केला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक डी. के. पगारे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maid theft jwellery in owner house at kalyan news tmb 01
Show comments