कल्याण : टिटवाळा रेल्वे स्थानकातून सकाळी ८.३३ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी अनेक वर्षांची सामान्य लोकल प्रवाशांना ठाणे, मुंबई परिसरातील कार्यालयीन वेळ गाठण्यासाठी सोयीस्कर होती. टिटवाळा परिसरातून मुंबईत परिसरात जाणारा बहुतांशी नोकरदार सामान्य प्रवासी आहे. या प्रवाशांना सकाळची ८.३३ ची सामान्य लोकल सोयीस्कर होती. या सामान्य लोकलचे तीन महिन्यापूर्वी मध्य रेल्वेने वातानुकूलित लोकलमध्ये रुपांतर करत प्रवाशांची गैरसोय केली आहे. यामुळे संतप्त प्रवाशांचा बुधवारी टिटवाळा स्थानकात उद्रेक झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा… टिटवाळा स्थानकात ‘रेल रोको’, सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल सेवा विलंबाने

वातानुकूलित लोकलचे भाडे दर प्रत्येक सामान्य प्रवासी, भायखळा बाजारात भाजीपाला घेऊन जाणाऱ्या प्रवाशाला परवडणारे नाहीत. या प्रवाशांनी तीन महिन्यापूर्वी नव्याने सुरू करण्यात आलेल्या सकाळच्या टिटवाळा वातानुकूलित लोकलच्या विरोधात अनेक निवेदने मध्ये रेल्वे प्रशासन,केंद्रीय मंत्री कपील पाटील, रेल्व मंत्री यांच्याकडे दिली. त्याची दखल प्रशासनाने घेतली नाही.

हेही वाचा… कोपरी पूलावरील वाहतूक शनिवार ते सोमवार मध्यरात्री पूर्णपणे बंद; वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता

गारेगार लोकलचे तिकीट दर, मासिक पास परवडणारा नसल्याने टिटवाळा सकाळच्या ८.३३ च्या सामान्य लोकलने प्रवास करणाऱ्या बहुतांशी प्रवाशांनी प्रवास बंद केला. हे प्रवासी कसाऱ्याहून टिटवाळा रेल्वे स्थानकात सकाळी ८.१९ वाजता येणाऱ्या अति जलद लोकलने मुंबईत प्रवास करतात. ही लोकल अतिजलद आहे. या लोकलला प्रवाशांची तुंडुंब गर्दी असते.

हेही वाचा… पाणी साठविण्याच्या पध्दतीमुळे कल्याण-डोंबिवलीत डेंग्यु, मलेरियाचे वाढते रुग्ण

कसारा लोकल उशिरा

टिटवाळा रेल्वे स्थानकातून मुंबईत नोकरी निमित्त जाणाऱ्या प्रवाशांना यापूर्वी कसारा लोकल वेळेवर आली नाही तर त्यांना टिटवाळा स्थानकातून सुटणाऱ्या लोकलचा आधार होता. तो आधार वातानुकूलित लोकल मुळे तुटला. गेल्या महिन्यापासून कसारा लोकल दररोज १० ते १५ मिनीट उशिरा धावत आहे. याविषयी प्रशासन सुशेगात असल्याने खर्डी, आसनगाव, वासिंद, टिटवाळा, कल्याण रेल्वे स्थानकांमधील प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.

रेल्वे मार्गात आंदोलन

बुधवारी सकाळी ८.१९ वाजता टिटवाळा रेल्वे स्थानकात कसाराहून येणारी लोकल नेहमीप्रमाणे उशिरा आली. त्यामुळे प्रवाशांचा संताप झाला. उशिराचे रडगाणे आम्ही सहन करणार नाही अशा घोषणा देत प्रवासी कसाराहून उशिरा आलेल्या लोकल समोर रेल्वे मार्गात उतरले. लोकल वेळेवर येण्याचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत रेल्वे मार्गातून हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा प्रवाशांनी घेतला. स्थानक व्यवस्थापक भगत यांनी यापुढे कसारा लोकल नियमित वेळेत येईल याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन प्रवाशांना दिले. त्यानंतर प्रवाशांनी आंदोलन थांबविले.

हेही वाचा… डोंबिवली: तळ कोपर ते अप्पर कोपर रेल्वे स्थानका दरम्यान करण्यात येणार पादचारी पुलाची उभारणी

“टिटवाळा येथून सकाळी ८.३३ ची सामान्य लोकल वातानुकूलित करू नका यासाठी प्रवाशांनी अनेक निवेदने रेल्वे अधिकाऱ्यांना दिली. त्याचा काहीही परिणाम झाला नाही. टिटवाळा स्थानकातून सकाळी वातानुकूलित सोडण्यात येत असल्याने प्रवाशांना इतर सामान्य लोकलवर अवलंबून राहावे लागते. कसारा लोकल वेळेत येत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.” – विजय देशेकर, रेल्वे प्रवासी संघटना पदाधिकारी

“ कसारा लोकल महिन्यापासून दररोज उशिरा धावते. त्यामुळे प्रवासी संतप्त होते. त्याचा उद्रेक आज झाला. हे रडगाणे कायम राहिले तर उग्र आंदोलन प्रवासी छेडतील.” – शैलेश राऊत, कल्याण कसारा रेल्वे प्रवासी संघटन

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Main reason behind the rail roko at titwala is 8 33 ac local asj