कल्याण: रस्ते, धूळ, खड्डे विषयांवरुन कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन नागरिकांकडून सातत्याने टीकेचे लक्ष्य होत आहे. संबंधित विभागाचे अधिकारी याविषयी उदासिन असल्याचे दिसून आल्याने आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी अभियंत्यांच्या वरिष्ठाला नवरात्रोत्सवापूर्वी रस्ते सुस्थितीत करा, अशी तंबी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, शिवसेनेच्या डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी रस्ते, धूळ, खड्डे विषयावरुन पालिका अभियंत्यांना डोंबिवलीतील ठाकुर्ली चौकात फैलावर घेतले. येत्या दोन दिवसात रस्ते सुस्थितीत करा, अन्यथा रस्त्यावरील धूळ तुमच्या तोंडाला फासली जाईल, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, शहरप्रमुख राजेश मोरे आणि संतोष चव्हाण यांनी अभियंत्यांना दिला. शहर अभियंता अर्जुन अहिरे, कार्यकारी अभियंता मनोज सांगळे, जगदीश सांगळे यांनी शहरात सुरू असलेल्या डांबरीकरण कामाची पाहणी केली. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अभियंत्यांना हा  इशारा दिला.

हेही वाचा >>> आरोग्य केंद्रांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यरात्री भेटी; सर्व सुविधा सज्ज ठेवण्याचे सक्तीचे आदेश

आम आदमी पक्षाने गुरुवारी खड्डे विषयावरुन पालिकेसमोर श्राध्द कार्यक्रम करुन प्रशासनाचे खड्डे विषयाकडे लक्ष्य वेधले. कल्याण, डोंबिवलीतील खड्डे, धूळ, रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे प्रवासी हैराण आहेत. खडीवरून दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. सायंकाळच्या वेळेत हवा कुंद असल्याने वाहनांमुळे धूळ उडण्याचे प्रमाण अधिक आहे. प्रवासी, रस्ते परिसरातील रहिवासी धुळीने हैराण आहेत. डोंबिवली शहरातील विविध भागातील रस्त्यांची पाहणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी केली. दोन दिवसात रस्ते सुस्थितीत करण्याचा इशारा अभियंतांना दिला. दरम्यान रस्ते खड्डे, धुळ याविषयी संबंधित विभागाचे अधिकारी उदासिन असल्याबाबत आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी नाराजी व्यक्त करत नवरात्रोत्सवापूर्वी रस्ते सुस्थितीत करा, अशी तंबी अभियंत्यांच्या वरिष्ठाला दिली आहे.

निकृष्ट कामे

रस्ते सुस्थितीत करण्याची ठेकेदारांकडून सुरू असलेली कामे अतिशय निकृष्ट पध्दतीने सुरू आहेत. ही कामे करताना कोणत्याही शास्त्रोक्त पध्दतीचा अवलंब केला जात नाही. रात्रीच्यावेळेत कामे करताना मजूर आणि त्यांचा मुकादम यांच्या व्यतिरिक्त एकही पालिका अभियंता, ठेकेदाराचा पर्यवेक्षक अभियंता घटनास्थळी नसतो. त्यामुळे रस्त्यावरील धूळ झाडून त्यावर फक्त डांबर, बारीक खडीचा थर टाकला जातो. हा रस्ता मुसळधार पाऊस झाला की सततच्या अवजड वाहनांमुळे लवकरच खराब होणार आहे, असे रस्ते बांधणीतील एका जाणकाराने सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maintain roads before navratri festival order commissioner dr bhausaheb dangde to engineers ysh
Show comments