ठाणे – शहरातील मजिवडा परिसरात असलेल्या टीएमटी बस थांब्याची जागा मेट्रोच्या कामामुळे बदलण्यात आली आहे. मात्र, या बदलामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नव्या बस थांब्याजवळील अरुंद रस्त्यांमुळे येथे सतत वाहतूक कोंडी होत असून एखादा अपघात झाल्यास प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून लोकसंख्या वाढली आहे. मुंबई येथे दररोज नोकरीनिमित्त प्रवास करणाऱ्यांना ठाणे सोयीस्कर होत असल्याने अनेकजण ठाण्यात स्थायिक होण्यास प्राधान्य देत आहेत. त्याचप्रमाणे ठाणे शहरातील घोडबंदर तसेच भिवंडी या ठिकाणी अनेक मोठ्या कंपन्या आणि लघु उद्योगांची कार्यालये कार्यरत आहेत. येथे दररोज नोकरीकरिता हजारो महिला आणि पुरूष कामगार येत असतात. हे कामगार प्रवासासाठी टीएमटी बसगाड्यांवर अवलंबून असतात. यासाठी दररोज ठाणे स्थानक परिसरातुन माजिवडा मार्गे अनेक प्रवासी टीएमटी बसगाड्यांमधून प्रवास करतात.

माजिवडा हा मुख्य वर्दळीचा परिसर आहे. माजिवडा मार्गे घोडबंदर, मानपाडा, गायमुख, वसंत विहार, कोलशेत, ब्रम्हांड, कापुरबावडी, ढोकाळी, बाळकुम, काल्हेर, कशेळी, पुर्णा या ठिकाणी टीएमटी तसेच बेस्टच्या बसगाड्या जातात. यासाठी माजिवडा येथील पेट्रोल पंप जवळ टीएमटी आणि बेस्टचा थांबा उभारण्यात आला होता. परंतु, शहरात अनेक महिन्यांपासून मेट्रोची कामे सुरू आहेत. या कामासाठी टीएमटी बस थांब्याची जागा बदलण्यात आली आहे. सध्या हा बस थांबा माजिवडा सर्कलच्या मागे डाव्या बाजूला उभागण्यात आला आहे. मात्र, या नविन टीएमटी बस थांब्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा बस थांबा मुख्य रस्त्याच्या कडेला असल्याने प्रवासी रस्त्यावरच उतरत आहेत. तर प्रवाशांना बसगाड्यांची वाट पाहत भर रस्त्यावर उभे रहावे लागत आहे. त्याचप्रमाणे मध्यभागी बसगाडी थांबल्याने मागच्या बाजुने येणाऱ्या इतर वाहनचालकांना अडथळा निर्माण होत आहे. यामुळे या भागात सायंकाळी ७ नंतर वाहतुक कोंडी निर्माण होत आहे. तसेच वाहतुक कोंडी निर्माण झाल्याने काही टीएमटी बसगाड्या या नविन थांब्यावर थांबत नसल्याचे काही प्रवाशांनी सांगितले.

सध्या माजिवडा या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू असल्याने टीएमटी बस थांब्याची जागा बदलण्यात आली आहे. या ठिकाणचे मेट्रोचे काम पुर्ण झाल्यानंतर पुन्हा हा थांबा जुन्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे.- भालचंद्र बेहरे, परिवहन व्यवस्थापक