ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावरील डोंगराळी भागात बुधवारी दुपारी ट्रेलर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात मुंबई नाशिक महामार्गावर ठाण्यातील कॅडबरी जंक्शन ते सरावली मार्गापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. या वाहतुक कोंडीमुळे मुंबईहून भिवंडी, कल्याणच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या चालकांचे हाल झाले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत येथील वाहतुक सुरळीत झाली नव्हती.

मुंबई येथून नाशिकच्या दिशेने बुधवारी दुपारी ट्रेलरमधून अल्युमिनिअम धातूचे मोठे तुकडे नेले जात होते. ट्रेलरमध्ये वाहन चालकासोबत त्याचा मदतनीस होता. ट्रेलर डोंगराळी परिसरात आला असता, अचानक वाहनामधील धातूचे तुकडे वाहन चालक बसलेल्या भागात आले. या घटनेमुळे वाहन चालक आणि त्याचा सहकारी वाहनात अडकून राहिले. दुपारी मुंबई नाशिक महामार्गावरून अवजड वाहनांची वाहतुक होते. तसेच कल्याण, भिवंडी आणि नाशिकच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या हलक्या वाहनांची वाहतुकही या मार्गावरून होत असते. अपघातामुळे मार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. मुंबई नाशिक महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असल्याने कोंडीत आणखी भर पडली. महामार्गावर दोन्ही दिशेला कॅडबरी जंक्शन ते भिवंडीतील सरावली पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती कोनगाव वाहतुक शाखेच्या कर्मचाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या पथकाने चालक आणि त्याच्या सहकाऱ्याला ट्रेलरमधून सुखरूप बाहेर काढले. सायंकाळी उशीरापर्यंत महामार्गाची कोंडी सुटली नव्हती. त्यामुळे वाहन चालकांचे हाल झाले.

Story img Loader