मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना सलग चौथ्या दिवशी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. शनिवार सकाळपासूनच भिवंडी आणि नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर साकेत पूल ते तीन हात नाका उड्डाणपूल पुलापर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तर ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांच्या भिवंडीतील पिंपळनेर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीमुळे सलग चौथ्या दिवशी मुंबई- नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना काही मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी तब्बल एक ते दीड तासांचा कालावधी लागत आहे. यामुळे वाहनचालकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.
मुंबई – नाशिक महामार्गावरून दररोज हजारो वाहनांची ये-जा होत असते. यामुळे या महामार्गावर प्रवाशांना कायम वाहतूक कोंडीचा सामना लागतो. गेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे मुंबई नाशिक महामार्गावरील साकेत पूलावर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहे. त्यामुळे या मार्गिकेवर मागील चार दिवसांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. वाहतूक कोंडीची समस्यां सोडविण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे शुक्रवारी सकाळी साकेत पुलावरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्यात आले होते. परंतु, शुक्रवारी रात्री आणि शनिवार सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरु असल्याने त्याच ठिकाणी पुन्हा खड्डे पडल्याचे दिसून आले आहे. यामुळे शनिवारी सकाळी ठाण्याहून भिवंडी आणि नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या साकेत पूल ते तीन हात नाका उड्डाणपूल येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. तर या मार्गावरून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांच्या रांगा या भिवंडीतील पिंपळनेर पर्यंत येऊन पोहचल्या आहेत. या कोंडीमध्ये अनेक खासगी वाहने, मुंबई आणि ठाणे येथील बसगाड्या अडकून पडल्या आहेत. यामुळे कामानिमित्त मुंबई – नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गाला सलग चौथ्या दिवशी वाहतूक कोंडीमुळे होणारा मनःस्ताप सहन करावा लागत आहे.