कुळगांव-बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला काठावरचे का होईना बहुमत मिळाले असून पालिकेत पहिल्यांदाच स्वबळावर शिवसेना सत्तेत येणार आहे. शिवसेनेला २४ तर भाजपला २० जागा mu04मिळाल्या आहेत.  राष्ट्रवादीला दोन तर एक अपक्ष निवडून आला आहे. काँग्रेसला बदलापूरमध्ये खातेही खोलता आलेले नाही. भाजपने गेल्या निवडणूकीपेक्षा कामगिरी चांगली केली असली तरी, बहुमत न मिळाल्याने सभागृहात पुढील पाच वर्षे विरोधी बाकावर बसावे लागणार आहे.
गेले काही दिवस बदलापूरात निवडणुकीमुळे वातावरण तापले होते. यात राजकीय गुन्हेगारीचे प्रमाणही मोठय़ा प्रमाणावर वाढले होते. यात शिवसेना व भाजपचे नेते आघाडीवर होते. पालिका निवडणुकीत खरी लढत या दोन पक्षांमध्येच झाली. नव्याने वाढलेल्या शहरीकरणात मुंबईहून आलेल्या स्थलांतरितांनी शिवसेनेला साथ दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निवडणूकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा फटका बसला असून शिवसेनेचे संजय गायकवाड, मिथुन कोशिंबे, प्रभाकर पाटील तर भाजपचे मिलिंद नार्वेकर, मेघा गुरव, अविनाश पातकर आदी पाच ते दहा वर्षांपेक्षा जास्त सत्ता उपभोगलेल्या दिग्गजांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवला आहे.
तसेच अपक्ष शेख नदीम मोहम्मद अमीन, शिवसेनेचे चेतन धुळे, भाजपचे किरण भोईर, सूरज मुठे आदी पंचविशी ते तिशीतल्या उमेदवारांचे नशीब यंदा फळफळले आहे.
शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रे व भाजपचे येथील आमदार किसन कथोरे यांच्यात ही प्रमुख लढाई होत होती. परंतु, यात शिवसेनेने बाजी मारली असून येत्या ९ मे पर्यंत शिवसेनेचा नगराध्यक्ष विराजमान होणार आहे.

दाम्पत्य विजयी
पालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण पाच दाम्पत्ये निवडणूक रिंगणात होती. यात माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे आणि रुचिता घोरपडे हे भाजपचे उमेदवार अनुक्रमे- प्रभाग क्रमांक ४ आणि प्रभाग क्रमांक १६ मधून विजयी झाले आहे. प्रचाराच्या वेळी केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र तर बदलापूरमध्ये राजेंद्र अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात येत होत्या. तर शिवसेनेचे उमेदवार माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे आणि विणा म्हात्रे हे अनुक्रमे प्रभाग क्रमांक ३६ आणि प्रभाग क्रमांक ३८ मधून विजयी विजयी झाले आहेत.

विद्यमान नगरसेवकांना फटका
प्रभाकर पाटील (अपक्ष), मिथुन कोशिंबे (शिवसेना), मेघा गुरव (भाजप), विकास गुप्ते (मनसे), संजय गायकवाड (शिवसेना), राजेंद्र चव्हाण (शिवसेना) हे सर्व विद्यमान नगरसेवक पराभूत झाले. तर भाजप शहर अध्यक्ष मिलिंद नार्वेकर, माजी नगराध्यक्ष स्नेहा पातकर यांचे पती अविनाश पातकर यांचाही पराभव झाला आहे.

विवेक मोरे तिसऱ्यांदा विजयी
विवेक मोरे हे दर निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांतून आणि प्रभागातून निवडून आला आहेत. पहिल्यांदा त्यांनी शिवसेनेकडून, दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आणि आता भाजपकडून त्यांनी निवडणूक लढवली. या वेळी त्यांना विजय मिळाल्याने प्रभाग, पक्ष कोणाताही असो आपला विजय निश्चित होतो अशी प्रतिक्रिया त्यांनी या वेळी व्यक्त केली. तर शिवसेनेच्या अंकिता घोरपडे या चौथ्यांदा विजयी झाल्या आहेत.

कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ नगरपालिका
विधानसभा निवडणुकीपासून भाजपने उभे केलेले आव्हान, शहरातील विकासकामांच्या रखडपट्टीबाबत होणारी टीका आणि पक्षांतर्गत बंडखोरी अशा तिहेरी संकटांचा सामना करत असलेल्या शिवसेनेने अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिकांच्या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. अंबरनाथमध्ये ५७ पैकी २६ तर बदलापुरात ४७ पैकी २४ प्रभागांत विजय मिळवत सेनेने आपली सत्ता कायम राखलीच; शिवाय भाजपमुळे आपल्या बालेकिल्ल्यांना लागलेली भगदाडेही बुजवल्याचे स्पष्ट झाले.