दरात यंदा २० ते ४० रुपयांची वाढ; कमी पावसाचा फटका
मकरसंक्रातीनिमित्त पालघर जिल्ह्यात घरोघरी कोनफळाची भाजी म्हणजेच उकडहंडी बनवली जाते, मात्र यंदा उकडहंडीला महागाईचा फटका बसला आहे. कमी पावसामुळे कोनफळाचा दर २० ते ४० रुपये प्रति किलो वाढल्याने या विशिष्ट खाद्यपदार्थ बनवण्याच्या खर्चाला महागाईची झळ बसली आहे.
मकरसंक्रातीनिमित्त पालघर जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदारांच्या घरी आणि विशेषत: वाडवळ समाजामध्ये उकडहंडी हा विशिष्ट व पारंपरिक खाद्यपदार्थ बनवला जातो. कोनफळ, रताळे, शेवग्याच्या शेंगा, पापडी, वांगी, वालगोळे, कोथिंबीर, नारळ, मटार, पातीचा कांदा, शेंगदाणे, तीळ यांसोबत मिरची व मसाल्याचे मिश्रण करून वाफेवर ही भाजी अत्यंत कमी तेलावर शिजवली जाते. पूर्वीच्या काळी मडक्यामध्ये हे मिश्रण ठेवून मडक्याचे तोंड केळीच्या पानाने बांधून बंद केले जाते. पालापाचोळा आणि जळाऊ साहित्याच्या मदतीने ही भाजी मडके भाजून, भाज्यांमधील पाण्यामधून निर्माण होणाऱ्या वाफेवर तयार केली जायची. सध्याच्या काळात मडक्यात उकडहंडी करणे कठीण होत असल्याने ही भाजी चुलीवर आणि कुकरमध्येही अशाच साहित्याच्या मदतीने केली जात आहे.
उकडहंडी तयार करण्याच्या प्रक्रियेत कोनफळाचा महत्त्वाचा वाटा असून सध्या साधे कोनफळ ४० ते ६० रुपये किलो, राते या प्रकारचे कोनफळ ८० ते १०० रुपये किलो तर गुजरातमधून येणारे ‘ब्लू’ प्रकारचे कोनफळ शंभर रुपये दराने बाजारामध्ये उपलब्ध आहे. यंदाच्या मोसमात कमी प्रमाणात झालेल्या पावसाचा फटका कोनफळ उत्पादनावर झाला असून त्याचे दर २० ते ४० रुपये प्रति किलो या दराने वाढल्याचे दिसून येत आहे.
उकडहंडी कशी बनवतात?
वांगी, शेवग्याच्या शेंगा, कोनफळ, किसलेला नारळ, शेंगदाणे, तीळ, पातीचा कांदा-कोथिंबीर, बटाटे, रताळे, तेल-हळद, मसाला, मीठ, चिरलेली मिरची आणि आले घ्यावे. यातील सर्व भाज्या योग्य प्रमाणात कापून एका मोठय़ा आकाराच्या गंजामध्ये (मोठा टोप) घ्याव्यात. त्यामध्ये खवलेला नारळ, कांद्याची पात, कोथिंबीर, तेल, हळद, मीठ, मसाला चिरलेली मिरची, आले चवीनुसार टाकून या सर्व भाज्या मिक्स कराव्यात. नंतर हे मिश्रण एका मोठय़ा तोंडाच्या मातीच्या मडक्यामध्ये भरावे. प्रथम मडक्याला आतून तेल लावावे आणि मडक्यामध्ये एक केळीचे पान ठेवावे. मिश्रण भरून झाल्यानंतर तोंडावर परत एकदा केळीचे पान ठेवावे. मडक्याचे तोंड वरच्या बाजूने परत एकदा केळीच्या पानाने बांधून घ्यावे. बांधून झालेले मडके जमिनीवर तोंडावर पालथे ठेवून त्यावर वाडीतील पालापाचोळा घालावा आणि तो पेटवावा, पालापाचोळा टाकताना हंडी कोणत्याही बाजूने उघडी पडणार नाही याची दक्षता घ्यावी. पेटवून झालेल्या पालापाचोळय़ाच्या राखेत हंडी साधारण अर्धा तास ठेवावी, जेणेकरून हंडीमधील सर्व मिश्रण शिजेल.