ठाणे – बचत गटांच्या माध्यामतून तयार केलेले जागतिक दर्जाचे उत्पादनांची विक्री ऑनलाईन पद्धतीने देखील व्हावी यासाठी ‘उमेद मार्ट’ या नावाने एक व्यासपीठ तयार करण्याचे काम सुरु आहे. या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तू ऑनलाईन पद्धतीने विक्रीसाठी उपलब्ध करता येणार असल्याची माहिती कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिली. ठाण्यातील गावदेवी मैदान येथे कोकण विभागीय, जिल्हास्तरीय मिनी सरस विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी कोकण विभागीय आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

कोकण विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, ठाणे आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय, जिल्हास्तरीय आणि मिनी सरस विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्यकार्यकारी अधिकारी रोहन घुगे, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या सरस विक्री प्रदर्शनात २० जिल्ह्यातून बचत गट सहभागी झाले आहेत, ही आनंदाची बाब आहे, असे कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले. तसेच या प्रदर्शनाला वज्रेश्वरी महोत्सव म्हटले असून ही वज्रेश्वरी माता नवसाला पावणारी असल्याचे सांगत त्यांनी चिमाजी आप्पा यांचे उदाहरण दिले. चिमाजी आप्पा यांनी ज्यावेळी वसईचा किल्ला ताब्यात घेण्यासाठी तीन वर्षे लढा दिला. पण, ते घेवू शकले नाही, अखेर वज्रेश्वरी देवीला साकडे घातले आणि पोर्तुगीजांवरती विजय मिळविला असा दाखला देत, याठिकाणी बचत गटातील महिला वज्रेश्वरीच्या रूपामध्ये येथे बसलेल्या आहेत. त्यामुळे हे प्रदर्शन देखील नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच बचत गटाच्या माध्यमातून महिला स्वतःचा संसार सांभाळत आहेत, बचत करताहेत, उत्पादन करताहेत, विक्री करताहेत आणि स्वतःच्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहे, ही फार मोठी अभिमानाची गोष्ट असल्याचे कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

सरस विक्री प्रदर्शन हा त्रिवेणी संगम

ठाण्यातील गावदेवी मैदानात भरविण्यात आलेला कोकण विभागीय, जिल्हास्तरीय आणि निमी सरस असा हा त्रिवेणी संगम असलेला कार्यक्रम आहे, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी व्यक्त केले. तसेच ठाणे जिल्ह्यात १० हजार ८०० महिला बचत गट असून प्रत्येक गटात १० ते १९ महिला सहभागी आहेत. त्याचा विचार करता सद्यस्थितीला जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक घरातील महिला आज बचत गटाला जोडली गेली असल्याचे त्यांनी सांगितले. बचत गटाचे काम हे तीन स्तरात सुरु आहे. सरस विक्री प्रदर्शन हा रेल्वे स्टेशनच्या जवळ आणि बाजारपेठ परिसरात आयोजित केल्यामुळे या ठिकाणी केवळ ठाण्यातीलच नव्हे, तर इतर शहरातील नागरिक या ठिकाणी भेट देण्याची शक्यता आहे, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Story img Loader