कल्याण– कल्याण पूर्व भागातील नेतिवली ते मलंग गड रस्त्याची मुसळधार पावसामुळे खड्डे पडून दुर्दशा झाली आहे. सर्वाधिक वर्दळीच्या या रस्त्याची दुर्दशा झाल्याने प्रवाशांची या रस्त्यावरुन प्रवास करताना हैराणी होत आहे.
पुणे, मुंबई परिसरातून येणारी वाहने मधला मार्ग म्हणून मलंग गड रस्त्याला प्राधान्य देतात. मुसळधार पाऊस सुरू झाल्याने वाहनांच्या वर्दळीमुळे या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या आडिवली ढोकळी, नेतिवली, नांदिवली तर्फ गावात तीन ते चार हजार बेकायदा चाळी, इमारतींची कामे झाली आहेत. ही कामे करताना या भागातील नैसर्गिक पाणी वाहून नेणारे स्त्रोत, गटारे, नाले भूमाफियांनी बुजविले.
हेही वाचा >>> ठाण्यात साथीच्या आजारांनी डोके वर काढले; डेंग्यू, मलेरिया आणि एच३ एन२ आजाराचे रुग्ण आढळले
मुसळधार पाऊस सुरू झाल्या पासून नेतिवली-मलंग गड रस्त्यावर पावसाचे आणि आजुबाजुच्या वस्तीमधील पाणी येते. या रस्त्यावर मुसळधार पाऊस सुरू असताना एक ते दीड फूट पाणी असते. यापूर्वी या रस्त्यावर एवढे पाणी कधीच नव्हते, असे या भागातील रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी सांगितले. नेतिवली, नांदिवली, पिसवली भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहिल्यापासून परिसरातील नागरी वस्तीमधील पावसाचे, सांडपाणी मलंग गड रस्त्याच्या दिशेने वाहून येते.
पावसाचे पाणी रस्त्यावर सतत साचून राहते. अवजड वाहनांची या रस्त्यावर सतत येजा असते. या सततच्या वर्दळीमुळे आणि पाणी तुंबून राहत असल्याने मलंग गड रस्त्याची वाताहत झाली आहे. या रस्त्यावरुन वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागते. मलंग गड भागात अनेक भाविक, पर्यटक जातात. त्यांनाही या खड्ड्यातील रस्त्यामधून जावे लागते. दुचाकीवरुन कल्याण मध्ये किटल्यांमध्ये दूध घेऊन येणाऱ्या विक्रेत्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत.
हेही वाचा >>> कल्याण जवळील कचोरे, नेतिवली टेकडीवरील १४० कुटुंबांना नोटिसा, पालिकेच्या संक्रमण शिबिरात निवासाचे नियोजन
या खड्ड्यांमुळे रस्त्यावर व्दारली येथे गुरुवारी रात्री खड्डा चुकविता असताना एका दुचाकी स्वाराचा डंपरखाली चिरडून मृत्यू झाला. पालिका प्रशासनाने तातडीने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची कामे हाती घेण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.