आर्थिक नियोजन फसल्याने ठेकेदार हैराण; खडीकरण पूर्ण
मलंगगड बस स्थानक ते फ्युनिक्युलर ट्रॉलीपर्यंतचा प्रवास भाविक, पर्यटकांना वाहनाने करता यावा म्हणून पर्यटन महामंडळाने दोनशे मीटरच्या सिमेंट रस्तेकामासाठी १० कोटी ४२ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून ठेकेदाराने तीन मोऱ्या बांधल्या आणि खडीकरणाचे काम पूर्ण केले. उर्वरित सिमेंट रस्त्याच्या कामासाठी निधी शिल्लक राहिला नाही, अशी धक्कादायक माहिती पुढे येऊ लागली आहे. वाढीव निधी शासन उपलब्ध करून देत नसल्याने अखेर ठेकेदाराने रस्तेकाम अर्धवट सोडून दिल्याचा प्रकार उघडकीला आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत हे काम करण्यात येत होते. शासनाने मलंगगडाला पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. या भागातील रस्तेकामासाठी १० कोटी ४२ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला होता. फ्युनिक्युलर ट्रॉलीपूर्वी रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे.
मलंगगड बस स्थानक ते फ्युनिक्युलर ट्रॉलीच्या पायथ्याकडील थांब्यापर्यंत दोनशे ते तीनशे मीटरचा सिमेंटचा पक्का रस्ता बांधण्याचे काम पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून हाती घेण्यात आले होते.
फेब्रुवारी २०१३ मध्ये ठेकेदाराला कामाचे आदेश देण्यात आले. ठेकेदाराने अठरा महिन्यांत हा रस्ता पूर्ण करणे आवश्यक होते. या कामासाठी पर्यटन विकास महामंडळाने १० कोटी ४२ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला, अशी माहिती बांधकाम विभागातील सूत्रांनी दिली. ठेकेदाराने रस्तेकाम सुरू करताना प्रथम या भागात डोंगरावरून येणारे पाणी वाहून जाण्यासाठी तीन ते चार मोऱ्या बांधून घेतल्या. उर्वरित तीनशे मीटर लांबीच्या रस्त्याचे खडीकरण करून घेतले. पर्यटन विभागाकडून रस्तेकामासाठी आलेला निधी मोऱ्या व खडीकरणाच्या कामासाठी संपला. वाढीव निधी देण्यास पर्यटन विभागाने हालचाली न केल्याने, स्वखर्चातून एवढे अवाढव्य काम करणे शक्य नसल्याने, ठेकेदाराने रस्ता रखडलेल्या स्थितीत टाकून निघून जाणे पसंत केले, असे बांधकाम विभागातील सूत्राने सांगितले.
ठेकेदाराला गावगुंडांचा उपद्रव
परिसरातील काही गावांमधील गावगुंडांनी या कामात विघ्न आणण्याचे प्रयत्न केले. रात्रीच्या वेळेत डम्पर व अन्य वाहनांमधील डिझेल, पेट्रोल काढून नेणे, डम्परचे सुटे भाग काढून नेणे असे प्रकार स्थानिकांकडून सुरू होते. ग्रामस्थांना जमिनाच्या बदल्य़ात त्यांच्या मुलांना ठेकेदाराने आपल्या बांधकाम कंपनीत सहभागी करून घ्याव किंवा नुकसानभरपाई द्यावी, काही जण तर दर महिन्याला आम्हाला ठरावीक हप्ता द्या, म्हणून ठेकेदाराला हैराण करीत होते. त्यामुळे हे काम रखडले अशी माहिती आता पुढे येत आहे.
निधी अपुरा पडल्याने आणि काही ग्रामस्थांनी कामात सतत अडथळे आणल्याने हे रस्तेकाम रखडले आहे. ठेकेदाराने हे काम अर्धवट स्थितीत ठेवले आहे.
– राजेश सोमवंशी, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग