माळशेज घाटातील निसर्गसौंदर्याचा नजारा अनुभवण्यासारखा आहे. सणावाराला हिरवा चुडा नि हिरवा शालू ल्यायलेल्या सुवासिनीप्रमाणे माळशेज घाट पावसाळय़ात वाटतो. डोंगरदऱ्यांतून असंख्य धबधबे निघू लागतात आणि या दुधाळ पाण्यात जलक्रीडा करण्यासाठी पर्यटकांची गर्दी व आनंद ओसंडून वाहतो. एखाद्या पावसाळी पर्यटनस्थळी एखाद्दुसरा धबधब्यावर भिजण्याचा आनंद पर्यटक घेत असतात. मात्र महामार्गावरच असलेल्या माळशेज घाटात धबधब्यांची मालिकाच पाहायला मिळते. नागमोडी वळणे आणि डोंगराच्या कपारीतून निघालेले फेसाळ धबधबे हे या घाटाचे आकर्षणच आहे.
घाटातील प्रत्येक धबधब्याला असे वैशिष्टय़पूर्ण नाव नाही. पण पर्यटकांनीच आणि प्रशासनानी काही धबधब्यांचे नामकरण केलेले आहे. त्यातच थितबी-सावर्णे, अंबामाळी, निसर्ग किमया, नानणतळा हे धबधबे पाहण्यासारखे आहेत. घाटात जात असताना दूर डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा आपल्याला दिसतो. तीन धारांत कोसळणारा हा धबधबा आणि तेथील निसर्गसौंदर्याचा नजराणा पाहताना तोंडातून आपसूक ‘वाह’ असे शब्द बाहेर येतात.
माळशेट घाटात जुन्नरकडे जाणाऱ्या मार्गावर लागणाऱ्या बोगद्याजवळून दऱ्याखोऱ्यांतून निसर्गसौंदर्य खूपच मनमोहक वाटते. डोंगरावरून पडणारे जलतुषार अंगावर घेताना मनमुराद आनंद मिळतो, पण या मार्गावरून गाडी जाताना गाडीवर पडणारा पाण्याचा धो धो आवाज मनाचा थरकापही उडवितो. पण या नागमोडी वळणावरून प्रवासाचा आनंद काही अवर्णनीयच आहे. बोगद्यातून पुढे गेल्यावर एका पठारावर पर्यटकांच्या सोयीसाठी एमटीडीसीचे रिसॉर्ट आहे. तेथून घाटाचे, डोंगरदऱ्यांचे आणि घनदाट जंगलाचा रमणीय नजराणा दिसतो. हा नजराणा डोळय़ांत साठवताना पर्यटकांची पावले या परिसरातून निघण्यासही मागत नाहीत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा