कल्याण – कल्याण रेल्वे स्थानकातील कर्जत बाजूकडील जिन्यावर आज सकाळी एका गर्दुल्ल्याने रेल्वे स्थानकात चाललेल्या एका महिला प्रवाशाला अचानक मिठी मारली. अचानक घडलेल्या या प्रकाराने संबंधित महिला घाबरली. तिने ओरडा केल्याने आणि इतर प्रवाशांनी त्या महिलेच्या बचावासाठी धाव घेऊन तिची सोडवणूक केली.
सकाळी वर्दळीच्या वेळेत गर्दुल्याने हा प्रकार केल्याने रेल्वे स्थानकात सुरक्षा व्यवस्था आहे की नाही. दिवस, रात्र कल्याण रेल्वे स्थानकातील दोन्ही बाजूच्या स्कायवाॅकवर गर्दुल्ले ठाण मांडून बसलेले असतात. ते रेल्वे सुरक्षा जवानांना दिसत नाहीत का, असे प्रश्न प्रवाशांकडून करण्यात येत आहे. उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे, कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शैलेश राऊत यांनी याप्रकाराबद्दल मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवारी सकाळी कामावर जाण्याचा पहिला दिवस असल्याने एक महिला घाईने लोकल पकडण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकातील कर्जत बाजूकडील जिन्यावरून फलाटाच्या दिशेने चालली होती. अचानक जिन्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका गर्दुल्याने त्या महिलेच्या मागे जाऊन तिला मिठी मारली. अचानक घडलेल्या याप्रकाराने महिला घाबरली. याशिवाय इतर प्रवासी हा प्रकार पाहून संतप्त झाले. इतर प्रवाशांनी आक्रमक होऊन गर्दुल्ल्याला चोप दिला. त्या महिलेची सोडवणूक केल्यावर ती महिला तेथून निघून गेली.
महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या अरगडे यांनी तातडीने वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर संबंधित माथेफिरूला पकडण्यासाठी लोहमार्ग पोलिसांनी चार तपास पथके तयार केली. रेल्वे जिन्यातील सीसीटीव्ही चित्रण तपासून पोलिसांनी संतोष शर्मा नावाच्या गर्दुल्ल्याला रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. त्याच्यावर लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही कल्याण रेल्वे स्थानकातील पूर्व भागातील स्कायवाॅकवर गर्दुल्ल्यांनी पहाटे, रात्रीच्या वेळेत प्रवाशांवर हल्ला केल्याचे प्रकार घडले आहेत. या प्रकारामुळे रेल्वे स्थानक भागातील गस्त वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येऊ लागली आहे.