खाद्य पदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या कंपनीचा गणवेश परिधान करून त्याआधारे उच्चभ्रू गृहसंकुलात शिरुन एका व्यवसायिकाच्या घरातील १२ लाख रुपयांची रोकड तसेच सोन्याच्या दागिन्यांची जबरी चोरी करुन नेणाऱ्या टोळीस ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने अखेर अटक केली आहे. अभिषेक देडे, जय भगत अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून याप्रकरणात एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांनी हे कृत्य पैसे कमवण्यासाठी केल्याचे प्राथमिक तपासात आले आहे. यातील जय भगत हा व्यवसायिकाच्या कुटुंबियांच्या ओळखीचा आहे. त्यामुळे त्यादिशेनेही पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पाचपाखाडी भागातील उच्चभ्रू संकुलात खाद्य पदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या कंपनीचा गणवेश परिधान करून चाकूच्या साहाय्याने एका व्यक्तीने व्यवसायिकाच्या घरातून १२ लाख रुपयांची रोकड आणि पाच लाख रुपयांचे दागिने जबरीदस्तीने चोरी करून नेल्याचा प्रकार ९ मार्चला उघडकीस आला होता. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. मुंबई पोलिसांनीही खाद्य पदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना कर्मचाऱ्यांच्या चारित्र्य पडताळणीच्या सूचना केल्या होत्या.
दरम्यान, या प्रकरणाचा संमातर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट एककडून सुरू होता. युनिट एकच्या पथकाने शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या साहाय्याने या प्रकरणाचा तपास सुरू केला. सुमारे ५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. त्यावेळी आरोपी हा घोडबंदर मार्गे वज्रेश्वरीच्या दिशेने जात असल्याचे समोर आले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचे छायाचित्र मिळविले आणि आरोपीच्या शोधासाठी खबऱ्यांचे जाळे पसरविले. त्यावेळी या प्रकरणातील आरोपी हा कल्याण भागात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी अभिषेक देडे याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आणखी दोघांच्या मदतीने हे कृत्य केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी एका १७ वर्षीय मुलालाही ताब्यात घेतले. तर मुख्य सूत्रधार जय भगत याला अटक केली. पैशांसाठी त्यांनी हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहेत. परंतु, यातील आरोपी जय भगत हा व्यवसायिकाच्या कुटुंबियांतील सदस्यांच्या ओळखीचा आहे. त्यामुळे त्या दिशेनेही पोलिसांनी तपास सुरू केला आहे.