बदलापूरः कर्करोगग्रस्त एका अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांना मदत करत असतानाच त्याच मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी २७ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी दीड महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी केलेल्या तपासानंतर आरोपी सुरज सिंग याला बिहारमधून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. कर्करोगाच्या उपचारादरम्यान ही मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर मुंबईच्या पोलीस ठाण्यात शून्य एफआयआर दाखल करण्यात आली होती.

बिहारमधल्या एका १३ वर्षीय मुलीला काही महिन्यांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले होते. त्यावर उपचारासाठी मुंबईला जाण्याचा सल्ला मुलीला अनेकांनी दिला. त्याचवेळी मुलीच्या शेजारच्या गावातील सुरज सिंग या व्यक्तीने त्यांना मदतीचा हात पुढे केला. त्याच्या मदतीने मुलीच्या कुटुंबियांनी बदलापुरात येण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांना सुरज सिंग याने घर घेऊन दिले. उपचाराच्या निमित्ताने सुरजचे अनेकदा संबंधित कुटुंबियांच्या घरी येजा होती.

या संवादाचा आणि गैरफायदा सुरज सिंग याने घेतला. त्याने तीन ते चार वेळा या १३ वर्षीय मुलीवर अत्याचार केले. उपचार सुरू असतानाच ही मुलगी गर्भवती असल्याची बाब समोर आली. त्यानंतर या प्रकरणात मुंबईच्या कस्तुरबा पोलीस ठाण्यात शून्य एफआयआर दाखल करण्यात आली होती. पुढे ही तक्रार बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात हस्तांतरीत करण्यात आली. बदलापूर पूर्व पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरू केला.

सुरूवातीला या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियांना पोलिसांनी चौकशीसाठी पाचारण केले होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीची ओळख पटत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात सुरूवात केली होती. मुलीच्या कुटुंबियांकडे चौकशी केली असता त्यांनी दोन ते तीन वेळा दिशाभूल करण्याची माहिती दिली. त्यामुळे पोलिसांचा तपास भरकटणार होता.

मात्र पोलिसांनी सखोल चौकशी करत सुरज सिंग हाच आरोपी असल्याची खात्री केली, अशी माहिती परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. आरोपी निष्पन्न झाल्यानंतर आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पथक तयार केले होते. त्यात पोलिसांना यश आले. नुकतेच पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी सुरज सिंग या बिहारमधून अटक केली आहे, असेही पोलीस उपायुक्त गोरे यांनी सांगितले आहे.

आरोपी सुरज सिंगने ओळखीचा आणि मदतीचा गैरफायदा घेत मुलीवर अत्याचार केले. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिांनी त्याला न्यायालयापुढे हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकारामुळे बदलापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.