लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे: मावशीच्या घरी दागिने आणि पैसे अधिक असल्याने त्या हव्यासापोटी आरफीन अन्वर सय्यद (२६) याने तिच्या घरातील सुमारे साडे पाच लाख रुपयांचे दागिन चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, घरातील कपाट उघडण्यासाठी त्याने एका किल्ली तयार करणाऱ्यालाही मावशीच्या घरी नेले होते. चोरी प्रकरणात आरफीन याला ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली असून त्याच्याविरोधात मुंबईत चार गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मुंब्रा येथे १४ जूनला तक्रारदार महिला एका कार्यक्रमानिमित्ताने गावी गेल्या होत्या. त्या घरी आल्या असता त्यांच्या घरातील कपाट फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा ५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे समोर आले. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर प्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या मालमत्ता शोध पथकाकडून सुरू होता.
हेही वाचा… ठाण्यात विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्ती अभियान; ठाणे महापालिका आणि कॉज फाऊंडेशनचा उपक्रम
मालमत्ता शोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषणाद्वारे आणि खबऱ्यांमार्फत पथकाने शोध सुरू केला. दरम्यान, यातील आरोपी हा मुंब्रा बाह्यवळण मार्ग येथे येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार किशोर भामरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने सापळा रचून आरफीन याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबूली दिली. त्याच्या झडतीमध्ये त्याच्या कडून चोरलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल असा ३ लाख ३० हजार ४५० रुपयांचा किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
हेही वाचा… डोंबिवलीत अल्पवयीन मुलीचा ज्येष्ठ नागरिकाकडून विनयभंग
आरफीन हा मुंबईत वास्तव्यास होता. काही दिवसांपूर्वीच तो मुंब्रा येथील कौसा भागात पत्नीसोबत राहण्यासाठी आला होता. याच परिसरात राहणाऱ्या त्याच्या मावशीच्या घराच्या टाळ्याची बनावट किल्ली तयार त्याने केली होती. मावशी गावी गेल्यानंतर त्याने घराचे दार बनावट किल्लीच्या साहाय्याने उघडले. मावशीने तिचे दागिने कपाटामध्ये ठेवले होते. त्याची किल्ली आरफीनकडे नव्हती. त्यामुळे त्याने परिसरातील एका किल्ली बनविणाऱ्या व्यक्तीला मावशीच्या घरी बोलवले. कपाट नामांकित कंपनीचे असल्याने किल्ली बनविणाऱ्याने त्यास नकार दिला तसेच तो निघून गेला. त्यानंतर आरफीनने कपाट फोडून दागिने आणि रोकड चोरी केली.