लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: संध्याकाळच्या वेळेत ठाकुर्ली भागात फिरण्यासाठी गेलेले एक रहिवासी पदपथावरील गटारावर झाकण नसल्याने गटारात पाय घसरुन पडले. बेसावधपणे गटारत पडल्याने या रहिवाशाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी ही घटना घडली.
सुंदरम अय्यर (५०) असे जखमी रहिवाशाचे नाव आहे. त्यांच्यावर पायावर शस्त्रक्रिया करण्यात येऊन १७ टाके पडले आहेत. अय्यरे हे बुधवारी संध्याकाळी नेहमीप्रमाणे आपल्या पत्नी सोबत ठाकुर्ली भागात फिरण्यासाठी गेले होते. ९० फुटी रस्त्यावरील बालाजी आंगण गृहसंकुल भागातून वेगाने चालत असताना अचानक त्यांचा पाय पदपथावरील गटारात गेला. तोल गेल्याने ते बेसावधपणे गटारात पडले. त्यांच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. पत्नीने त्यांना गटारातून बाहेर काढले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा… कल्याण मधील वाडेघर येथे गृहप्रकल्पाच्या दारात स्मशानभूमी; रहिवाशांचा विरोध
या भागात अनेक शाळा आहेत. लहान मुले, पालक या भागातून पायी येजा करतात. काही दुर्घटना घडली तर पालिका त्याची जबाबदारी घेईल असे प्रश्न रहिवासी उपस्थित करत आहेत. माजी नगरसेवक साई शेलार, भाजपचे डोंबिवली शहर सचिव राजू शेख यांना ही माहिती मिळताच त्यांनी पालिकेच्या बांधकाम विभागाला पत्र देऊन ठाकुर्ली परिसरातील गटारांवर झाकणे टाकण्याची मागणी केली आहे.