डोंबिवली- डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा भागातील विनायक कुंडल सोसायटीत राहणाऱ्या एका मामाने रागाच्या भरात आपल्या भाच्याची धारदार चाकूने राहत्या घरात कुटुंबीयांच्या समक्ष हत्या केली. दिवाळीच्या दिवशी हा प्रकार घडल्याने या भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी रात्री साडे दहा वाजता हा प्रकार सोसायटीतील सदनिकेत घडला.
हेही वाचा >>> कल्याण : घरासमोर रांगोळी सांडली म्हणून कुटुंबीयांना बेदम मारहाण; आंबिवली येथील प्रकार
यश संजय तिवारी (२२) असे हत्या झालेल्या भाच्याचे नाव आहे. सतीश राजनारायण दुबे (३१) असे आरोपी मामाचे नाव आहे. आरोपी सतीश हा बहिण सरिता तिवारी हिच्या घरी राहतो. सरिताच्या घरात तिचा पती, मुलगा यश ,सरिताचे वडील आणि आरोपी सतीश असे एकत्र राहतात. कौटुंबिक वादातून सतीशने वडील आणि सरिताचा पती संजय यांच्याशी भांडण सुरू केले. शिवीगाळ करुन तो दोघांना मारहाण करण्यास धावत होता. भांडण सोडविण्यासाठी भाचा यश मध्ये पडला. त्याचा राग सतीशला आला. त्याने रागाच्या भरात स्वयंपाक घरातील धारदार चाकूने यशवर वार केले. त्यात तो गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. मानपाडा पोलिसांना ही माहिती तात्काळ देताच पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी सतीशला अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील या प्रकरणाच तपास करत आहेत.