ठाणे : पत्नी घटस्फोट घेत असल्याने विक्रम भोईर (३५) याने भर रस्त्यात पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परिसरातील एका पाण्याच्या डबक्यात महिलेने उडी घेतल्याने या घटनेत तिचा जीव वाचला. परंतु ती अंदाजे ५० टक्के भाजली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिच्या जबाबानंतर विक्रम भोईर याला अटक झाली आहे.
जखमी महिला ३० वर्षीय असून २०१७ मध्ये तिचा विवाह विक्रम भोईर याच्यासोबत झाला होता. विक्रम हा मुंबईतील विक्रोळी भागात राहत असून तो रिक्षा चालक आहे. विक्रम हा तिच्यावर विनाकारण संशय घेत असल्याने मागील दोन वर्षांपासून ती तिच्या माहेरी म्हणजेच, चितळसर मानपाडा येथील निळकंठ वुड्स परिसरातील एका चाळीमध्ये वास्तव्यास होती. तिने पतीविरोधात ठाणे न्यायालयात घटस्फोटासाठी धाव घेतली होती. परंतु विक्रम हा प्रकरणाच्या तारखांना हजर राहत नसे. तसेच तिला सोबत राहण्यासाठी सांगत होता. त्यास महिलेचा विरोध होता.
सोमवारी ती परिसरातील दुकानामध्ये वस्तू खरेदी करण्यासाठी आली होती. त्यावेळेस विक्रम हा त्याच्या रिक्षामधून त्या ठिकाणी आला. त्यावेळी त्याने तिला अडवून घटस्फोटाच्या कारणावरून तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादानंतर त्याने रिक्षामध्ये ठेवलेले लोखंडी पाईप आणि पेट्रोलने भरलेली बाटली बाहेर काढली. त्याने लोखंडी पाईपने महिलेच्या डोक्यावर प्रहार केला. तो पाईप फेकून दिल्यानंतर त्याने तिच्या अंगावर पेट्रोल ओतले. त्यानंतर हातातील लाईटरने तिला जाळले.
पेट घेतल्यानतर तिने परिसरातील एका पाण्याच्या डबक्यात उडी मारली. या दरम्यान, विक्रम हा रिक्षा घेऊन तेथून निघून गेला. घटनेची माहिती तिच्या नातेवाईकांना मिळाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला उपचारासाठी परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेत ती अंदाजे ५० टक्के भाजल्याची माहिती चितळसर पोलिसांनी दिली. महिलेचा जबाब नोंदविल्यानंतर विक्रम भोईर याच्याविरोधात चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.