कल्याण : उत्तरप्रदेशातील जोनपूर येथील जमिनीच्या वादातून कल्याण पूर्वेतील नाना पावशे चौकातील एका इमारतीत एका इसमाने आपल्या चुलत भावाला गोळीबार करून ठार केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी तात्काळ तपास करून गोळीबार करणाऱ्या इसमाला अटक केली आहे.

रामसागर दुबे असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. रंजीत दुबे असे गोळीबारात मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. मृत हा एका टोळीचा सदस्य होता. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती. गोळीबार करणारा रामसागर हा उत्तरप्रदेशातील पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार आहे, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की मृत रंजीत दुबे हा कुटुंबीयांसह कल्याण पूर्वेतील नाना पावशे चौकात एका इमारतीत राहतो. अटक आरोपी रामसागर दुबे हे उत्तरप्रदेशातील जोनपूर येथील रहिवासी आहेत. जोनपूर येथे रामसागर, रंजीत यांची सामुहिक जमीन आहे. या जमिनीच्या विषयावरून त्यांच्यात मागील चार वर्षापासून वाद सुरू आहेत. मागील वर्षी या वादातून त्यांच्यात जोरदार भांडण झाले होते. त्यानंतर दोघेही काही दिवस उत्तरप्रदेशातील तुरुंगात होते. अलीकडेच दोघेही तुरुंगातून बाहेर आले होते.

तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांच्यात पुन्हा जमिनीवरून वाद सुरू झाले होते. बुधवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान रंजीत आपल्या कल्याणमधील राहत्या इमारतीच्या बाहेर उभा असताना अचानक तेथे रामसागर दुबे आला. त्याने रंजीतच्या दिशेने गोळीबार करत त्याचा पाठलाग केला. जीव वाचविण्यासाठी रंजीत इमारतीच्या चौथ्या माळ्यापर्यंत धावत गेला. पण तेथे तो कोसळला. त्यानंतर रामसागरने धारदार चाकुने रंजीतवर वार करून त्याला ठार मारले.

या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच आपण पोलीस ठाण्यात अर्ज केले होते. त्याची दखल घेतली जात नव्हती, असे रंजीतच्या कुटुंबीयांनी सांंगितले. या गोळीबार आणि खुनाची माहिती कळताच कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साबाजी नाईक रंजीतच्या इमारतीत दाखल झाले. तात्काळ रंजीतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून कल्याणमधून गोळीबार करणारा रामसागर दुबे यांना अटक केली. दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.

Story img Loader