लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : मोमाज व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशांची गरज होती. ही गरज भागविण्यासाठी आंबिवलीतील चांद उर्फ अकबर महम्मद शेख (३०, रा. संतोषीमाता नगर, नवनाथ कॉलनी, आंबिवली) याने गेल्या महिन्यात गळ्यात सोन्याचा ऐवज असलेल्या आंबिवली अटाळी भागातील रंजना चंद्रकांत पाटेकर (६०) या वृध्देची हत्या केली होती. खडकपाडा पोलिसांनी कौशल्याने तपास करून सराईत गुन्हेगार चांदला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचा सोन्याचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यात चांद आरोपी होता. तो आधारवाडी कारागृहात होता. आठ महिन्यापूर्वीच तो तुरुंगातून सुटून बाहेर आला होता. तो मानेगाव आंबिवली येथे राहण्यास आला होता. चांद तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याच्यामधील गुन्हेगारीवृत्तीने पुन्हा डोके वर काढले होते. त्याला मोमाज विक्रीचा व्यवसाय सुरू करायचा होता. यासाठी त्याला पैशाची गरज होती.

आंबिवली अटाळीत खापरी पाडा भागात सिध्दीविनायक चाळीत राहणाऱ्या रंजना चंद्रकांत पाटेकर यांची हत्या करण्याचा निर्णय त्याने घेतला होता. रंजना यांच्या गळ्यात सोन्याचा ऐवज होता. हा ऐवज चोरून तो विकून मिळणाऱ्या पैशातून मोमाज व्यवसाय सुरू करण्याची आखणी चांदने केली होती. चांदने रंजना यांच्या घरावर अनेक दिवस पाळत ठेवली होती.

गेल्या महिन्यात संध्याकाळच्या वेळेत रंजना घरात एकट्या होत्या. त्यावेळी चांद त्यांच्या घरासमोर गेला. पिण्यासाठी पाणी मागितले. रंजना घरात पाणी आणण्यासाठी जाताच चांदने त्यांच्या घरात प्रवेश केला. घरातील दूरचित्रवाणीचा आवाज मोठा केला. आतून दरवाजा बंद केला. पाणी घेऊन येत असलेल्या रंजना यांना घट्ट पकडून त्यांचे तोंड हाताने दाबून ठेवले. प्रतिकार करण्यासाठी वाव नसल्याने रंजना यांचे तोंड जमिनीवर आपटून, गळा दाबून चांदने त्यांना जीवे ठार मारले. त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कानातील सोन्याची कर्णफुले घेऊन चांद फरार झाला होता. एक लाखाहून अधिक किमतीचा हा ऐवज होता.

रंजना यांच्या नातेवाईकांना हा प्रकार समजताच त्यांचे नातेवाईक हर्षल पाटकर तात्काळ घटनास्थळी आले. या हत्येचे कोणतेही धागेदोरे पोलिसांकडे नव्हते. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी चांदला तपासासाठी ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने रंजना पाटेकर यांच्या हत्येची कबुली पोलिसांना दिली. त्याला खडकपाडा पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले आहे.

उपायुक्त अतुल झेंडे, साहाय्यक आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. अमरनाथ वाघमोडे, पोलीस निरीक्षक संदीप शिवले, साहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गायकवाड, अनिल गायकवाड, उपनिरीक्षक अर्जुन दांडेगावकर, सुधीर पाटील, हवालदार राजु लोखंडे, योगेश बुधकर, कुंदन भामरे, संदीप भोईर, किरण शिर्के, विनोद कामडी, ज्योती देसले, संजय चव्हाण, महेश बगाड, ललित शिंदे, राहुल शिंदे, अविनाश पाटील, अनंता देसले, सुरज खंडाळे, मनोहर भोईर, धनराज तरे यांच्या पथकाने अटकेची कारवाई केली.