लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : घोडबंदर येथील कासारवडवली भागात पत्नी आणि मुलांची हत्या करणाऱ्या अमित बागडी (२९) याला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने हरियाणा येथून अटक केली. पत्नी भावना ही मुलांसह त्याचा भाऊ विकास याच्या घरामध्ये वास्तव्यास होती. तसेच तिचे विकास सोबत प्रेमसंबध होते या रागातून त्याने क्रिकेटच्या बॅटने तिघांची हत्या केल्याची कबूली दिली. तिघांच्या हत्येनंतर अमित याला विकासला सुद्धा ठार करायचे होते अशी बाब तपासात समोर आल्याचे उपायुक्त शिवराज पाटील यांनी सांगितले.
घोडबंदर येथील कासारवडवली गाव परिसरात गुरुवारी अमित बागडी याने त्याची पत्नी भावना (२४), मुलगी खुशी (६) आणि मुलगा अंकुश (८) यांची निर्घृण हत्या केली होती. याप्रकरणानंतर संपूर्ण ठाणे हादरले होते. अमित याचा भाऊ विकास याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर याप्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनीट पाचकडून सुरू होता. उपायुक्त शिवराज पाटील आणि साहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली युनीट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, पल्लवी ढगे-पाटील, अविनाश महाजन, उपनिरीक्षक सुनील अहिरे, हवालदार रोहीदास रावते, सुनील निकम, जगदीश न्हावळदे, माधव वाघचौरे, सुनील रावते, पोलीस नाईक तेजस ठाणेकर, उत्तम शेळके, पोलीस शिपाई यश यादव यांचे पथक तयार केले.
पथकांनी सीसीटीव्ही कॅमेरे तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू असता, अमित बागडी हा हरियाणा येथे त्याच्या मूळ गावी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांची दोन पथके हरियाणा येथे रवाना झाली. त्याला येथील एका रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबूली दिली.
म्हणून केली हत्या
अमितचा भावनासोबत २०१३ मध्ये विवाह झाला होता. हरियाणा येथे वास्तव्यास असताना अमितला अमली पदार्थांच्या सेवनाचे व्यसन लागले होते. २०१९ मध्ये अमितने अमली पदार्थाच्या नशेमध्ये भावनाला बेदम मारहाण केली होती. त्यामुळे भावना तिच्या दोन्ही मुलांना घेऊन काही दिवस तिच्या माहेरी राहण्यास गेली होती. त्यानंतर अमितचा भाऊ विकास हा त्या तिघांना घेऊन त्याच्या कासारवडवली येथील घरी राहण्यास आला होता. या कालावधीत विकास आणि भावना यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. याची माहिती अमितला मिळाली होती. त्यानंतर अमित देखील नवी मुंबई येथे वास्तव्यास आला होता. तो भावना आणि त्याच्या दोन्ही मुलांना भेटण्यासाठी विकासच्या घरी येत असे. १३ डिसेंबरला खुशी हिचा वाढदिवस होता. या निमित्ताने अमित हा विकासच्या घरी काही दिवस राहण्यास आला होता. गुरुवारी सकाळी ७.३० वाजता विकास कामानिमित्ताने बाहेर गेला होता. त्यानंतर भावना आणि अमित यांच्यामध्ये वाद झाले. या वादातून अमितने घरातील क्रिकेटच्या बॅटने भावनाच्या डोक्यात प्रहार केला. त्यानंतर त्याने दोन्ही मुलांनाही बॅटने मारहाण केली. सकाळी ११.३० वाजता विकास घरामध्ये आला असता, त्या तिघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले.
हत्या केल्यानंतर अमित हा नवी मुंबईतील उलवेमध्ये राहणाऱ्या त्याच्या काकांच्या घरी गेला. तिथे त्याने जेवण केले. तसेच त्याने भावना आणि मुलांची हत्या केल्याची माहिती नातेवाईकांना दिली. त्यानंतर तो रेल्वे मार्गे कुर्ला येथे आला. तिथून दादर आणि त्यानंतर मुंबई सेंट्रल येथे गेला. येथून त्याने हरियाणाच्या दिशेने रेल्वेगाडीने प्रवास सुरू केला. पोलिसांच्या पथकाला माहिती मिळाल्यानंतर पथक विमानाने हरियाणाला गेले. तसेच येथील एका रेल्वे स्थानकात थांबले. अमित हा स्थानकात उतरला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली.