डोंबिवली – गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत एका ३२ वर्षाच्या इसमाने एका अल्पवयीन मुलीला मिठाईमध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला होता. या घटनेनंतर इसम उत्तर प्रदेशातील त्याच्या मूळ गावी पळून गेला होता. उत्तर प्रदेश पोलीस आणि मानपाडा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत शनिवारी इसमाला उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातून अटक करण्यात आली.

या लैंगिक अत्याचार प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात पीडित कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मानपाडा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की पीडित मुलगी आणि गुन्हा दाखल इसम हे उत्तर प्रदेशातील आहेत. ते डोंबिवलीत एकत्र राहत होते. ते एकमेकांंना ओळखत होते. दोघेही कचरा वेचक म्हणून काम करत होते. इसमाने अल्पवयीन मुलीला ‘तू मला आवडतेस. तु माझ्या बरोबर लग्न कर, नाहीतर तुला मी पळवून नेईन,’ असे बोलून ऑक्टोबरपासून तिच्याशी गैरकृत्य करण्यास सुरुवात केली होती.

हेही वाचा – बदलापूर : रासायनिक सांडपाणी वाहिनीचा प्रश्न सुटणार! १२८ कोटींच्या भुयारी गटार योजनेला सुरुवात, जुनी वाहिनी बदलणार

एकदा त्याने मुलगी घरात एकटीच असताना मिठाईमध्ये गुंगीचे औषध टाकून ते तिला खाण्यास दिले. मुलीची शुद्ध हरपल्यावर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. ही गैरकृत्य कोणाला सांगितली तर तुझ्यासह तुझ्या भावाला ठार मारून टाकीन अशी धमकी गुन्हा दाखल इसम पीडितेला देत होता. हे प्रकार असह्य झाल्याने पीडितीने मानपाडा पोलीस ठाण्यात इसमाविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार कायद्याने गुन्हा दाखल करून घेतला होता.

हेही वाचा – डोंबिवलीत वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

लैंगिक अत्याचारानंतर इसम त्याच्या मूळ गावी पळून गेला होता. मानपाडा पोलीस त्याचा शोध घेत होते. तो हाती लागत नव्हता. गेल्या आठवड्यात इसम उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील कपिलवास्तू या मुळगावी आला आहे, अशी माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने ही माहिती उत्तर प्रदेश पोलिसांना दिली. उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने पाळत ठेऊन इसमाला मरवटीया कुर्मी गावातून शिताफीने अटक केली. ही माहिती मानपाडा पोलिसांना देण्यात आली. मानपाडा पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशात जाऊन इसमाला ताब्यात घेतले. त्याला मानपाडा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी दिली.

Story img Loader