मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेगाडीतून प्रवास करणाऱ्या कर्णबधिर तरूणावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्याला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या १६ वर्षीय मुलाला रविवारी रात्री उशीरा ठाणे लोहमार्ग पोलिसांनी भिवंडी येथून ताब्यात घेतले आहे. तो गर्दुल्ला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.दिवा येथे राहणारे प्रमोद वाडेकर हे कर्णबधिर आहेत. शनिवारी रात्री ते कांजूरमार्ग येथून दिवा येथे जात असताना रेल्वेगाडीतील अपंगाच्या डब्यात एका व्यक्तीने अमली पदार्थाचे ज्वलनशील पदार्थ त्यांच्या शर्टवर लावून आग लावली.
हेही वाचा >>>ठाणे : अपंगाच्या डब्यात प्रवाशाच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतले
या घटनेत प्रमोद यांचा संपूर्ण डावा हात भाजला. तसेच उजव्या हाताच्या पंजालाही दुखापत झाली आहे. डब्यातील एका प्रवाशाच्या मदतीने आग विजविणे शक्य झाले. या घटनेनंतर प्रमोद यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी रविवारी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका १६ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. तो गर्दुल्ला असल्याचे पोलिसांनी सांगितले.