तिघांपैकी एकाला अटक; बंदूकही हस्तगत

ठाणे : बोरिवलीतील राष्ट्रीय उद्यानात शिकारीसाठी सापळे लावल्याचे उघडकीस आल्यानंतर आता ठाण्यातील येऊरच्या जंगलातही शिकारी फिरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्याघ्रगणनेसाठी जंगलात लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये तीन व्यक्ती हातात बंदुका आणि कुऱ्हाड घेऊन फिरताना दिसल्या आहेत. त्यातील एकाला वनविभाग आणि ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटने अटक केली आहे. त्याने येऊरच्या जंगलात पक्ष्यांची शिकार केल्याची कबुली दिली आहे. मोठय़ा प्राण्यांची शिकार होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

मुंबईतील फिल्मसिटीच्या हरित क्षेत्रात सापळे रचून बिबटे तसेच इतर प्राण्यांची शिकार होत असल्याचे डिसेंबर महिनाअखेरीस उघडकीस आले होते. याप्रकरणी आठ आरोपींना वनविभागाने अटक केली होती. त्यापैकी दोन जण आदिवासी पाडय़ांतील रहिवासी होते. आरोपींनी दोन वर्षांपूर्वी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तुळशी तलावाच्या परिक्षेत्रात हरणाच्या पिल्लाची शिकार केल्याचे कबूल केले होते. या पाश्र्वभूमीवर ठाण्यातील येऊरमध्येही व्याघ्रगणनेसाठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यांमध्ये तीन व्यक्ती बंदूक आणि कुऱ्हाड हातात घेऊन फिरताना दिसले. वनविभागाने त्या तिघांचा शोध सुरू केला होता. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटनेही या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला होता. दोन्ही विभागांच्या पथकाने शनिवारी कॅमेऱ्यात दिसणाऱ्या तिघांपैकी एकाला अटक केली. येऊर परिक्षेत्र वन अधिकारी राजेंद्र पवार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे, पोलीस उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

चोरलेला कॅमेरा जप्त

सुशांत ऊर्फ तुषार भोवर असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो येऊर येथील वणीचापाडा परिसरात राहतो. कॅमेऱ्यात आपले चित्रीकरण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याने आणि त्याच्या साथीदारांनी कॅमेरा चोरला होता. तो सुशांतच्याच घरात सापडला. त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. त्यांच्याकडे एअरगन कशी आली, त्यांनी आतापर्यंत कोणत्या प्राण्यांची शिकार केली, याचा तपास सुरू आहे, अशी माहिती येऊर परिक्षेत्र वन अधिकारी राजेंद्र पवार यांनी दिली.

राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. येऊरमधील घटना महत्त्वाची आहे. कारण आरोपींकडे एअरगन आढळली आहे. या बंदुकीने एखादा मोठा प्राणीही जखमी होऊ शकतो. येऊरमधील आदिवासींना वनविभागाचे कायदे माहीत असूनही ते शिकार करत असतील, तर या घटनेचा सखोल तपास व्हायला हवा.

– आदित्य पाटील, अध्यक्ष,

वाइल्ड लाइफ वेल्फेअर असोशिएशन, ठाणे

Story img Loader