वाहन परवान्यावेळी अट घालण्याचा सहपोलीस आयुक्तांकडून प्रस्ताव
मद्यधुंद अवस्थेत बेफामपणे बस चालविणाऱ्या टीएमटी बसचालकाच्या प्रतापामुळे ठाणे वाहतूक शाखेतील एका पोलीस कर्मचाऱ्याला हकनाक प्राण गमवावे लागल्याच्या घटनेनंतर ठाणे वाहतूक पोलिसांनी संपूर्ण शहरामध्ये सार्वजनिक तसेच खासगी बसच्या चालकांची श्वास विश्लेषक यंत्राद्वारे मद्य तपासणी सुरू केली आहे.
बसमधील प्रवासी तसेच रस्त्यावरील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही तपासणी मोहीम राबविण्यात येत असली तरी त्यामुळे इच्छीतस्थळी पोहोचण्यास उशीर होत असल्याने वाहतूक पोलिसांना प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याची बाब पुढे आली आहे. या पाश्र्वभूमीवर ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांनी राज्याच्या परिवहन विभागाला नुकताच एक प्रस्ताव पाठविला असून त्यामध्ये सार्वजनिक तसेच खासगी बसचालकांची संबंधित व्यवस्थापनाने मद्य तपासणी करण्याची अट वाहन परवान्यांमध्येच समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील बसचालक गजानन शेजुळ याच्या मद्यधुंद अवस्थेतील प्रतापामुळे वाहतूक शाखेतील पोलीस नाईक चंद्रकांत साळुंखे यांना प्राण गमावावे लागले. या घटनेमुळे टीएमटीच्या चालकांची मद्य तपासणी होत नसल्याची बाब अधोरेखित झाल्यामुळे ठाणेकर प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या सार्वजनिक वाहतुकीबरोबरच शहरातील खासगी बस वाहतूक व्यवस्थाही चर्चेत आली होती. या पाश्र्वभूमीवर टीएमटीच्या सर्वच बसचालकांची दररोज नियमित मद्य तपासणी करण्यासंबंधीचे पत्र ठाणे वाहतूक पोलिसांनी महापालिका प्रशासनाला दिले होते. त्याचबरोबर अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये तसेच ठाणेकरांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी संपूर्ण शहरामध्ये सार्वजनिक तसेच खासगी बसचालकांची श्वास विश्लेषक यंत्राद्वारे मद्य तपासणी मोहीम हाती घेतली आहे.
या मोहिमेत एका चालकाची श्वास विश्लेषक यंत्राद्वारे तपासणी करण्यासाठी सुमारे १५ ते २० मिनिटांचा अवधी लागतो. त्यामुळे सार्वजनिक उपक्रमातील बसचालकांची तपासणी करण्यासाठी बस रस्त्यामध्ये थांबविली तर त्यातील प्रवाशांच्या वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे वाहतूक पोलिसांना त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून अशा प्रवाशांमुळे काही वेळेस कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच या तपासणीसाठी बस रस्त्यावर थांबविल्यास तेथील वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन कोंडी होऊ शकते. तपासणीदरम्यान बसमधील प्रवाशी खाली उतरले तर रस्त्यावरील वाहनांमुळे अपघात होऊन त्यांच्या जीवितास धोका पोहचू शकतो. दुचाकी आणि चारचाकी अशा वाहनचालकांकडून मद्य प्राशन करून वाहन चालविण्याचे प्रमाण जास्त आहे, मात्र सार्वजनिक तसेच खासगी बसच्या तपासणी मोहिमेत वाहतूक पोलीस व्यस्त राहिले तर त्याचा परिणाम दुचाकी व चारचाकी वाहनांच्या कारवाईवर होईल. परिणामी अपघातांच्या संख्येत वाढ होईल.
या सर्व बाबी लक्षात घेऊन ठाण्याचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांनी राज्याच्या परिवहन विभागाला नुकताच एक प्रस्ताव पाठविला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असा आहे प्रस्ताव..
सार्वजनिक व खासगी वाहतूक तसेच कंपनी बसचालकांची दररोज हजेरी घेण्यात येते. त्याचप्रमाणे संबंधित व्यवस्थापनाने त्यांची श्वास विश्लेषक यंत्राद्वारे मद्य तपासणी करावी. या तपासणीनंतरच संबंधित चालकाच्या ताब्यात वाहन देण्यात यावे. वाहनचालक प्रवासादरम्यानही मद्य प्राशन करण्याची शक्यता असल्याने संबंधित व्यवस्थापनाने रस्त्यावरील ठरावीकमहत्त्वाच्या टप्प्यांवर चालकांची मद्य तपासणी करण्याची व्यवस्था करावी. मद्य पिऊन वाहन चालविल्यामुळे होणाऱ्या अपघातांचे गांर्भीय समजाविण्यासाठी चालकांची दरमहा समुपदेशन कार्यशाळा घेण्यात यावी. तसेच मद्य प्राशन करून वाहन चालविताना आढळल्यास संबंधित चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी. या सर्व बाबींचा सार्वजनिक व खासगी बसेस तसेच मालवाहू वाहनांच्या परवाना अटीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी राज्याच्या परिवहन विभागाकडे केली आहे, अशी माहिती ठाणे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी दिली. तसेच या अटीमुळे मद्यपी चालकांवर आळा घालणे शक्य होईल आणि संभाव्य अपघातांना प्रतिबंध करणे शक्य होईल, असा दावाही त्यांनी केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Management should test bus driver alcohol