जनमानसातील प्रतिमेची पाहणी करणार; ठाणे ग्रामीण पोलिसांची योजना

विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करायच्या अनेक कसोटय़ा आहेत, परंतु पोलीस विभागाच्या कामगिरीचा लेखाजोखा ठेवण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. ठाणे ग्रामीण पोलिसांनी मात्र आपले पोलीस कसे काम करतात याचा अदमास घेण्याचा निर्णय घेतला आहे. मीरा रोडच्या ‘दालमिया इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च’च्या मदतीने थेट नागरिकांमध्ये जाऊन लोकमानसात पोलिसांची प्रतिमा कशी आहे, त्यांच्या कामाच्या पद्धतीबाबत लोकांना नेमके काय वाटते याची सर्वेक्षणातून चाचपणी करण्यात येणार आहे. तृतीय पक्षाच्या माध्यमातून पोलीस दलाचे लेखापरीक्षण करण्याचा हा पहिलाच प्रयत्न असणार आहे.

पाश्चिमात्य देशात इंग्लंडसह अनेक युरोपीय देशातील पोलीस यंत्रणा स्थानिक पातळीवरील शैक्षणिक संस्थांशी जोडल्या गेल्या आहेत. जनसामान्यांच्या समस्यांकडे पाहण्याचा पोलिसांचा एक साचेबद्ध दृष्टिकोन ठरून गेलेला असतो, परंतु शैक्षणिक संस्था मात्र या समस्यांकडे वेगळ्या नजरेने पाहात असतात. पोलीस यंत्रणा आणि शैक्षणिक संस्था यांना यावर एकत्रित काम केले तर त्यातून समाजात आणि पोलिसांमध्ये अनेक सकारात्मक बदल घडत असल्याचा या देशांचा अनुभव आहे. याच संकल्पनेचा धागा पकडून कोकण विभागीय विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज यांनी या धर्तीची योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. एक मार्चपासून मीरा-भाईंदरमध्ये या योजनेचा प्रारंभ झाला आहे. पोलीस दल नेमके कुठे कमी पडते आहे, त्यात सुधारणा करण्यासाठी काय उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे याची माहिती या सर्वेक्षणामुळे मिळणार असल्याचे नवल बजाज यांनी सांगितले. मीरा रोडच्या एन. एल. दालमिया महाविद्यालयातील इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनजमेंट स्टडीज अँड रिसर्च विभागाचे सहकार्य घेतले आहे. महाविद्यालयाचे विद्यार्थी शहरातील विविध परिसरात फिरून पोलिसांची कामगिरी, त्यांची सामान्य लोकांमध्ये असलेली प्रतिमा, त्यांचे पोलीस विभागाबाबतचे मत याबबत सर्वेक्षण करणार आहेत.

पाच विषय

सर्वेक्षणासाठी पाच प्रमुख विषयांची निवड करण्यात आली आहे. मीरा-भाईंदर शहरातील नागरिकांच्या मनात असलेली पोलिसांची प्रतिमा आणि त्यांची पोलिसांबाबतची संकल्पना यांचा अभ्यास, आपल्या कर्तव्यात झोकून देऊन काम करण्याची आणि कामाबाबत कटिबद्ध राहण्याची प्रवृत्ती पोलिसांमध्ये वाढीस लावणे, आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात पोलीस दलाची प्रतिमा उंचावणे, अमली पदार्थ व्यसनाधीनतेची समस्या आणि त्याकडे पाहण्याचा बहुआयामी दृष्टिकोन, समाजातील एकता आणि सलोखा यांचा अभ्यास या पाच विषयांवर सर्वेक्षणात भर देण्यात येणार आहे.

अन्य शहरांतही सर्वेक्षण

सर्वेक्षण पूर्ण झाले की वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सर्वेक्षण पथकातील तज्ज्ञ यांची बैठक होणार आहे आणि त्यात सर्वेक्षणादरम्यान गोळा झालेल्या माहितीवर अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी आणि प्रतिमा सुधारण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जाणार आहेत. सर्वेक्षणातून हाती आलेली माहिती नागरिकांसाठी जाहीरही केली जाणार आहेत. याच धर्तीवर वसई-विरार आणि इतर शहरांमध्येही सर्वेक्षण केले जाणार आहे.

सर्वेक्षण असे होणार..

* मीरा-भाईंदर महापालिकेच्या २४ प्रभागांची निवड सर्वेक्षणासाठी करण्यात आली आहे.

*  प्रत्येक प्रभागात एक विद्यार्थी त्यांच्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहेत.

*  विद्यार्थ्यांना एक प्रश्नावली देण्यात आली आहे आणि त्याच्या आधारे ते निश्चित केलेल्या विषयांवर माहिती गोळा करणार आहेत.

*  प्रत्येक विषयांसाठी एकंदर ४०० सर्वेक्षण नमुने गोळा करण्यात येणार आहेत.

*  संपूर्ण मार्च महिनाहे सर्वेक्षण सुरू राहणार आहे.