अंबरनाथ, बदलापूरमध्ये सर्वपक्षीय बैठकीत निर्णय
बदलापूर : शहरांमधील करोनाचे संकट पाहता यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव हा जास्तीत जास्त अडीच दिवसांचा करण्याचा निर्णय अंबरनाथ आणि बदलापुरातील गणेशोत्सव मंडळांनी घेतला आहे.
दोन्ही नगरपालिकांच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीत स्थानिक लोकप्रतिनिधी, गणपती मंडळ, पोलीस आणि पालिका प्रशासनाच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. यंदा शहरातील ९० टक्के गणपतींचे विसर्जन संकुलांच्या आवारातच करायचे असून मूर्तीची उंचीही अडीच फुटांपर्यंत ठेवण्याला मंडळाच्या प्रतिनिधींनी संमती दिली आहे. त्याचप्रमाणे या वर्षभरात कोणताही उत्सव रस्त्यावर साजरा करण्यास परवानगी नसेल असेही या वेळी पोलीस आणि पालिका प्रशासानाने स्पष्ट केले आहे.
या बैठकीत अंबरनाथ आणि बदलापूर अशा दोन्ही शहरांतील सार्वजनिक गणपती मंडळांचे आपली गणेशमूर्ती जास्तीत जास्त अडीच फूट ठेवण्यावर एकमत झाले आहे. त्याचप्रमाणे यंदाचा गणपतीचा काळ हा दहा ते अकरा दिवसांवरून अडीच दिवसांवर आणण्यावर गणपती मंडळांनी संमती दिली आहे. गणेशोत्सवासाठी सर्व परवानगी ऑनलाइन पद्धतीने दिली जाणार आहे. यंदा या दोन्ही शहरांत कोणत्याही गणपती मंडळाला रस्त्यावर उत्सव साजरा करण्यास परवानगी दिली जाणार नसल्याची माहिती दोन्ही नगरपालिकांचे प्रशासक जगतसिंग गिरासे यांनी या वेळी दिली.