मंडप सजावटकार, छायाचित्रकार, वाढपी, आचाऱ्यांच्या कमाईवर गदा
कल्पेश भोईर, लोकसत्ता
वसई : करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी २५ मार्चपासून लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे लग्नसोहळ्यासाठीचे मंडप सजावटकार, छायाचित्रकार, वाढपी, आचारी आणि इतर व्यावसायिकांच्या कमाईवर गदा आली आहे.
जानेवारी ते मे हा कालावधी लग्नसराईच्या मुहूर्तासाठी महत्त्वाचा समजला जातो. परंतु टाळेबंदीमुळे लग्नसोहळ्यांवर बंधने आली आहेत. यामुळे लग्नसराईसाठी मंडप सजावटकारांना सर्व साहित्य गोदामातच ठेवावे लागले आहे.
लग्नसराईसाठी व्यावसायिकांनी मंडपासाठी लागणारे कापड, विविध प्रकारचे आकर्षक सेट, इलेक्ट्रॉनिक साहित्य आदी वस्तूंची खरेदी करून ठेवली होती, तर काही ठिकाणांहून मिळालेली कामे पूर्ण करण्यासाठी साहित्य भाडय़ाने घेतले होते. त्यांना ही आगाऊ रक्कम दिली आहे. तर ज्यांच्या घरी लग्न आहे त्यांच्याकडून लग्न सेट उभारण्यसाठी घेतलेली आगाऊ रक्कमही परत करावी लागत आहे.
लग्नसोहळ्याचा हंगाम वाया गेल्याने कमाई पूर्णपणे बंद झाल्याचे एका मंडप सजावटकाराने सांगितले.
दुसरीकडे लग्नसराईत जेवण तयार करण्यासाठी आणि ते वाढण्यासाठी आचारी आणि वाढपी मंडळींना मोठी मागणी असते. या काळात मोठी कामे मिळतात. या हंगामातच रोजंदारी म्हणून मोठी कमाई होते. मात्र, टाळेबंदीत हा व्यवसायच ठप्प झाला आहे.
टाळेबंदीनंतर काय?
लग्नाच्या आठवणी नव्याने जागृत करण्याची एकच सोय म्हणजे सोहळ्याची काढण्यात आलेली छायाचित्रे. त्यामुळे छायाचित्रकारांना विविध संधी मिळतात. मात्र, टाळेबंदीत मार्च, एप्रिल आणि मे हे तीन महत्त्वाचे महिने वाया गेले आहेत. या दिवसांत छायाचित्रकारांसाठी होणारी कमाई पूर्णपणे थांबली आहे. यात लग्नसमारंभ आणि विवाहपूर्व चित्रीकरण (प्रीवेडिंग शूट) रद्द झाले आहे. त्यामुळे टाळेबंदी उठवल्यानंतर काय, असा प्रश्न छायाचित्रकारांसमोर आहे.