कल्याण : कल्याणमध्ये मंगळसूत्र चोरांची दहशत वाढल्याने सकाळ, संध्याकाळ फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. बुधवारी संध्याकाळी तीन तासाच्या अवधीत दोन पादचारी महिलांच्या गळ्यातील एक लाख रुपये किमतीची मंगळसूत्र दोन भुरट्या चोरांनी लांबवली. एका डाॅक्टर महिलेच्या गळ्यातील, मंदिरातून घरी चाललेल्या एका वृध्देच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविले आहे.
खडकपाडा पोलिसांनी सांगितले, कल्याण पश्चिमेतील भोईरवाडी भागात राहणाऱ्या प्रा. डाॅ. संगीता श्रीकांत पांडे (५६) या आपल्या सुनेसह रात्री भोजन झाल्यानंतर रात्री साडे दहा वाजता घराबाहेर पडल्या होत्या. वाणी विद्यालय येथून पायी जात असताना वाधवा सभागृहासमोरील रस्त्यावर दुचाकीवरील दोन जण अचानक प्रा. पांडे यांच्या दिशेने आले. काही कळण्याच्या आत दुचाकी स्वाराच्या मागे बसलेल्या इसमाने प्रा. पांडे यांच्या मानेवर जोराची थाप मारुन त्यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. अचानक मानेवर फटका पडल्याने घाबरुन त्या जमिनीवर पडल्या. त्यांना दुखापत झाली आहे. घटनेनंतर आरोपी भोईरवाडीच्या दिशेने पळून गेले.
दुसऱ्या एका घटनेत चिखलेबागमध्ये राहणाऱ्या अरुणा हेमंत ठमके (६८) बुधवारी योगिनी एकादशी असल्याने शिवाजी चौकातील विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन, भजन ऐकून संध्याकाळी साडे सात वाजता घरी निघाल्या असताना त्यांना वेताळवाडी झोझवाला संकुल येथे एका इसमाने अडवून त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले. अरुणा यांनी चोरट्याला प्रतिवाद करताच त्याने आजींना ठार मारण्याची धमकी दिली. या झटापटीत तो मंगळसूत्र हिसकावून पळून गेला. महात्मा फुले पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार केली आहे.