डोंबिवली – डोंबिवलीत फडके रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात कोपर भागातील एक महिला उपचारासाठी दाखल आहे. या महिलेने रविवारी सकाळी आपल्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र काढून रुग्णालयातील खाटेवरील डोक्याखालील उशीखाली ठेवले. त्यानंतर त्यांनी उशीखाली पाहिले तर तेथे मंगळसूत्र नव्हते. या महिलेच्या पतीने याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

कोपर गाव भागात राहणारे अमोल वाघमारे यांनी ही तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे. अमोल वाघमारे यांची पत्नी अलका उपचारासाठी डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवरील एका खासगी बँकेच्या शेजारी असलेल्या एका रूग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. त्यांच्या गळ्यात ३६ हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र होते. वैद्यकीय उपचार सुरू असल्याने आणि झोपेत असताना मंगळसूत्र अंगाला टोचते म्हणून त्यांनी रविवारी सकाळी सहा वाजता मंगळसूत्र काढून उशाखाली ठेवले.

वैद्यकीय उपचारासाठी उठल्यानंतर आणि सकाळचे कार्यक्रम उरकल्यानंतर त्यांनी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान उशीखाली हात घालून तेथील मंगळसूत्र काढून ते गळ्यात घालण्याचा प्रयत्न केला. उशीखाली ठेवलेले मंगळसूत्र त्यांना आढळले नाही. त्यांनी बिछाना तपासला. खाटेखाली तपासले. कोठेच मंगळसूत्र आढळून आले नाही. अज्ञात व्यक्तिने ते चोरून नेल्याचा संशय व्यक्त करून या महिलेच्या पतीन रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस उपनिरीक्षक गाडेकर याप्रकरणाचा तपास करत आहेत.