कल्याण – कल्याण मधील बांधकाम व्यावसायिक आणि मंगेशी ग्रुपचे मालक मंगेश गायकर यांना त्यांच्या कार्यालयात पिस्तूलची गोळी लागल्याची घटना समोर आली आहे. ही गोळी कार्यालयातील काचेवर उडून फुटलेल्या काचा अंगावर उडाल्याने त्यांचा मुलगाही जखमी झाला आहे.ही घटना गुरूवारी दुपारी  मंगेश गायकर यांच्या चिकनघर येथील मंगेशी वर्ल्ड कार्यालयात घडली.

मिळालेली माहिती अशी, मंगेश गायकर स्वतःच्या संरक्षणासाठी असलेल्या परवानाधारी पिस्तूलची कार्यालयात देखभाल करीत होते. यावेळी त्यांच्या पिस्तुला मध्ये गोळ्या होत्या. पिस्तूल साफ करताना अचानक त्यांचे बोट खटक्यावर पडले. पिस्तुलातून चुकून उडालेली गोळी त्यांच्या हाताला लागली. ती गोळी कार्यालयातील काचेवर उडाल्याने काचा फुटल्या. फुटलेल्या काचा मंगेश यांचा मुलगा श्यामल गायकर यांच्या अंगावर उडाल्या.  तेही गंभीर जखमी झाले., मंगेश गायकर यांच्या डाव्या हाताच्या पंजाला दुखापत झाली आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

दोघांनाही तातडीने कल्याणमधील मीरा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महात्मा फुले चौक आणि बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.