वसईत आंबा, केळी बागायतदारांचे नुकसान; मच्छीमारही हवालदिल

मार्चचा कडक उन्हाळा सुरू झाला असतानाच अवकाळी पावसाने शुक्रवारी पहाटे वसई परिसरात दमदार हजेरी लावली. यामुळे घामाच्या धारांनी त्रस्त रहिवाशांना काहीसा दिलासा मिळाला असेल, पण तालुक्यातील शेतीचे पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. तालुक्यातील वसई गाव, निर्मळ, अर्नाळा, कळंब परिसररातील अनेक आंबा आणि केळी बागायतदारांना पावसाचा मोठा फटका बसला आहे.

शुक्रवारी पहाटे सहा वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतातील पिकांची भरपूर नासाडी झाली. आलेला आंब्याचा मोहोर, छोटे आंबे गळून पडलेले दिसून येत आहे. भेंडी, काकडी, वाल आदी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.

वसई तालुक्यात १२ हजार ५०० हेक्टर शेतजमीन आहे, त्यापैकी तीन हजार ५०० हेक्टर बागायती शेतीचे क्षेत्र आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुटलेल्या सोसाटय़ाच्या वाऱ्याने केळीच्या बागाही उद्ध्वस्त झाल्या. वसईची पश्चिम किनारपट्टीवर बन केळी, वेलची केळी, भूर केळी यांची लागवड केली जाते. परंतु गेल्या ३ ते ४ दिवसांपासून हवामानात झालेला बदल, सुटलेला वारा आणि अवकाळी पाऊस यामुळे भुईगाव, रानगाव, वसई, कळंब, राजोडी, निर्मळ या ठिकाणी केळीपिके आडवी झाली आहेत. एका महिन्यानंतर केळीचे उत्पादन हातात येणार होते. मात्र पावसामुळे केळी आडव्या झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, असे निर्मळ येथील शेतकरी रवींद्र पाटील यांनी सांगितले.

मच्छीमारांचे मोठे नुकसान

वसईमध्ये आधीच मत्स्य दुष्काळ असतानाच अवकाळी पाऊस पडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून वसईत सुरू असलेल्या वादळी वारा आणि पावसामुळे मासेमारीसाठी गेलेल्या बोटी किनाऱ्यावर परत आल्या आहेत. डिझेल, बर्फ व खलाशांमागे केलेला खर्च वाया गेल्यामुळे प्रत्येक बोटीमागे सुमारे ६०,००० ते १,००,००० लाखांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर किनाऱ्यावर सुकत ठेवलेली मासळी पावसामुळे खराब झाल्याने कोळी महिलांचेही मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. अवकाळी पावसात वाळत ठेवलेली सुकी मासळी भिजल्यामुळे त्यात किडे निर्माण होतात. ही मासळी फेकून देण्याखेरीज कुठलाच पर्याय नसतो.

‘पंचनामे करा’

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने मत्स्यव्यवसायमंत्री एकनाथ खडसे यांनी पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. एकनाथ खडसे यांनी असेच पंचनामे मच्छीमारांचेही करावेत, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल व सचिव दिलीप माठक यांनी केली आहे.