सागर नरेकर, निखिल अहिरे
ठाणे : कोकणातून येणाऱ्या हापूस आंब्याचे गगनाला भिडलेले दर आणि परराज्यातील आंब्यांमधील गोडव्याबाबत असलेला संभ्रम यामुळे मुंबई, नवी मुंबईसह ठाणे आणि उपनगरांमध्ये ठाणे जिल्ह्यातील आंब्याचा आता वरचष्मा दिसू लागला आहे. ठाणे जिल्ह्यातील केसर, हापूस आणि रत्ना जातीच्या आंब्यांना बाजारपेठांमध्ये मोठी मागणी असून अवीट गोडवा आणि खिशाला परवडणाऱ्या किमतीमुळे या आंब्यांना पसंती मिळते आहे.
मुंबई आणि आसपासच्या राज्यातील बाजारपेठ नव्या साधनांमुळे जवळ येऊ लागल्याने उत्पादित मालाचा उत्तम परतावा मिळतो आहे. त्यात कृषी विभागाने शेतकऱ्यांना माहिती, योजना आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत केलेल्या सहकार्यामुळे फळबागा लागवडीकडे शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. याचा परिणाम म्हणून गेल्या वर्षभरात जिल्ह्यात फळबागा लागवडीचे क्षेत्र १०८० हेक्टरवर पोहोचले.
विशेष म्हणजे यात तब्बल ७५९ हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड करण्यात आली आहे. याच ठाणे जिल्ह्यातील आंब्याने आता मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि इतर उपनगरांमधील बाजारपेठा व्यापण्यास सुरुवात केली आहे. कोकणातील प्रसिद्ध हापूस आंब्यांच्या किमती अनेकदा सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नसतात.
परराज्यातून येणाऱ्या आंब्याच्या गोडव्याबाबत ग्राहकांमध्ये साशंकता आहे. अशा परिस्थितीत ठाणे जिल्ह्यातील बागांमध्ये पिकलेल्या हापूस, केसर आणि रत्ना जातीच्या आंब्यांना ग्राहक पसंती देताना दिसत आहे. या आंब्याला अवीट गोडी असून त्याचे दरही सर्वसामान्य ग्राहकाला परवडणारे आहेत. हापूस आंब्याचे वजन आणि आकारमानही मूळ कोकणातील हापूस आंब्याच्या जवळ जाणारे आहे. त्यामुळे या आंब्याच्या खरेदीचे प्रमाण वाढले आहे, असा दावा शेतकरी आणि व्यापारी करत आहेत. त्याचवेळी केसर आंब्यांची मागणीही वाढल्याचे दिसून आले आहे.
रत्ना या जातीच्या आंब्याचीही विक्री मोठय़ा प्रमाणावर होत असून किरकोळ बाजारातही या आंब्याला चांगला दर मिळतो आहे. परिणामी जिल्ह्यातील आंबा बागायतदार स्थानिक बाजारपेठांनाच लक्ष्य करताना दिसत आहेत.
केसरला प्राधान्य
हापूस आंब्याचे उत्पादन एक वर्षांआड येत असते. त्याचवेळी केसर आंबा दरवर्षी उत्पादन देतो. त्यामुळे दरवर्षी उत्पन्न देणाऱ्या या केसर आंब्याच्या लागवडीला बागायतदार प्राधान्य देत आहेत.
करोना काळात दाक्षिणात्य राज्यांतून येणाऱ्या मद्रासी हापूस या आंब्याची आवक घटली होती. त्याचवेळी जिल्ह्यातील आंब्याची मुंबईसह इतर बाजारात मागणी वाढली. ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सकारात्मक बाब आहे. – दीपक कुटे, कृषी उपसंचालक, ठाणे.
कोकणातून तसेच दाक्षिणात्य राज्यांतून येणारा आंबा बाजारात लवकर दाखल करण्यासाठी परिपक्व नसतानाही झाडावरून तोडला जातो. त्यामुळे अनेक आंब्यांमध्ये हवी तशी गोडी हल्ली चाखायला मिळत नाही. मात्र, ठाणे जिल्ह्यात होणारा आंबा इतर आंब्यांच्या तुलनेत उशीर विक्रीसाठी येत असल्याने तो परिपक्व असतो. तसेच कोकणातून येणाऱ्या आंब्याच्या तुलनेत हा कमी किमतीने विकला जातो. – दिलीप देशमुख, आंबा उत्पादक, वांगणी.
मागील वर्षी झालेली लागवड
शहापूर – ३५२.२८ हेक्टर
मुरबाड – १७१.५० हेक्टर
कल्याण – ५२.८३ हेक्टर
अंबरनाथ – ५०.८० हेक्टर
भिवंडी – १३१.७९ हेक्टर