ज्या बंगल्यात चोरी, तिथेच अनेक दिवस मुक्काम; अवलिया चोराला पोलिसांकडून बेडय़ा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई : चोरी केल्यानंतर चोर त्या ठिकाणाहून पळून जातो. मात्र माणिकपूर पोलिसांनी अटक केलेला एक अवलिया चोर ज्या ठिकाणी चोरी करायचा, त्या ठिकाणी अनेक दिवस मुक्काम करायचा. तिथे मजा करून झाल्यावर इतर ठिकाणी चोरी करायला जायचा. वसईतील एका बंगल्यात तर तो तब्बल तीन महिने ऐषारामात राहत होता.

वसई-विरार परिसरात असलेले अनेक बंगले वापराविना पडून आहेत. अनिवासी भारतीय आणि मुंबईत राहणाऱ्या अनेकांनी वसई-विरार परिसरात बंगले घेऊन ठेवले आहेत. या बंगल्यात ते वर्षांतून क्वचितच येत असतात. एरवी ते बंगले बंद असतात. नेमकी हीच बाब राजकुमार निशाद ऊर्फ ब्रिजेश यादव (२५) या भुरटय़ा चोराने हेरली. तो शहरातील बंद बंगले हेरायचा. ज्या बंगल्यात कुणी राहत नाही आणि कुणी येण्याची शक्यता नाही, अशा बंगल्यात शिरून तो चोरी करायचा. त्याच बंगल्यात तो मुक्काम करायचा. तेथून मग इतर ठिकाणी चोरी करायला जायचा. स्टेला येथील एक दुमजली बंगल्यात त्याने चोरी केली आणि त्या बंगल्यात तब्बल तीन महिने मुक्काम ठोकला होता. या बंगल्याचे मालक दुबईला राहतात. हा बंगला भरवस्तीतला आहे. तो दिवसा बंगल्यात राहायचा. सकाळचा नाष्टा बनवायचा. एसी लावून झोपायचा. टीव्ही बघायचा. रात्री मात्र तो दिवे लावत नव्हता. या बंगल्यात राहून तो रात्री इतर ठिकाणी चोरी करायला जात होता.

त्याच्या कार्यपद्धतीबाबत बोलताना माणिकपूर पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक आसिफ बेग यांनी सांगितले की, राजकुमार हा सडपातळ शरिरयष्टीचा आहे. तो बंगल्याच्या खिडकीच्या गजातून, एक्झॉस पंख्याच्या खिडकीतून प्रवेश करायचा. बंगल्यात कुणी नाही हे लक्षात आल्यावर तो बंगल्यातच राहत होता. त्याच्या एका साथीदाराला अटक केल्यानंतर आम्हाला त्याची माहिती मिळाली आणि त्याला बेडय़ा ठोकल्या, असे ते म्हणाले.

राजकुमार याच्याकडून चोरीच्या विविध घटनांमधील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एरवी चोरी करून बंगल्यात मुक्काम ठोकणाऱ्या या अवलियाचा आता मुक्काम पोलीस कोठडीत झाला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manikpur police arrested burglar who hiding in posh bungalow in vasai
Show comments