मंजुनाथ को.-ऑप. सोसायटी,
टिळकनगर, डोंबिवली पूर्व.
संस्कृती आणि परंपरा याचा वारसा घेऊन पुढे जाणारे डोंबिवली शहर विकासाचे अनेक टप्पे पार करू पाहात आहे. समस्या या सर्वाच्याच पाचवीला पुजलेल्या असतात. परंतु त्यावर केवळ चर्चा न करता त्या कशा सुटतील, याचा विचार होणे गरजेचे आहे. चाळीस वर्षांपूर्वी दहा बाय दहा चौरस फूट जागेत राहणारे अनेक डोंबिवलीकर आता ४०० ते ८०० चौरस फूट जागेत राहात आहेत. जागा बंदिस्त असली तरी मिळालेली ‘स्पेस’ (हक्काची जागा) ही बहुमूल्य असल्याचे येथील काही ज्येष्ठ मंडळी सांगतात. मंजुनाथ निवासी संकुल त्यापैकी एक. डोंबिवली पूर्वला असणारे आणि चाळिशीच्या दिशेने मार्गक्रमण करणारे हे निवासी संकुल अजूनही टुमदार आहे.
डोंबिवलीतील चार रस्ता येथील टिळकनगर परिसरात टिळकनगर विद्यामंदिर शाळेजवळ, नामदेव पथावर, मंजुनाथ नावाने चार मजली दोन इमारती उभ्या आहेत. या दोन इमारतींमध्ये चार विंग असून त्यात सुमारे ९० ते ९५ च्या आसपास सदनिका आणि काही दुकाने आहेत. डोंबिवली स्थानकापासून चालत अगदी १५ ते २० मिनिटांच्या अंतरावर हे निवासी संकुल आहे. हल्ली दोन-पाच वर्षांत इमारतींचा रंग उडतो. त्या जुन्या वाटू लागतात. मात्र मंजुनाथ संकुलात असलेल्या दोन इमारती भक्कम आणि मजबूत आहेत. आता चाळिशीत असलेल्या या इमारतींना पुढील चाळीस वर्षेही काहीच धोका नसल्याचा विश्वास रहिवासी व्यक्त करतात.
निवासी संकुलापासून एमआयडीसी जवळ आहे. नगर परिषद अस्तित्वात असलेला ४० वर्षांपूर्वीचा तो काळ. येथे मोकळी जागा होती. काही ठिकाणी चाळी, तर काही ठिकाणी तुरळक इमारती होत्या. मोकळी जागा असल्याने या इमारतीतील रहिवाशांना या औद्यागिक परिसरातून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक वायुप्रदूषणाचा सामना करावा लागत असे. कालांतराने काही कंपन्या बंद तर काही स्थलांतरित झाल्याने तसेच संकुलाच्या सभोवतालीही अनेक इमारतींचा वेढा पडल्याने हे प्रदूषण जरा कमी झाले आहे. परंतु वस्ती वाढल्याने वाहनेही वाढली. त्यामुळे वाहनांच्या कर्णकर्कश ध्वनींचा आणि वाहतूक कोंडीचा नव्याने त्रास डोंबिवली स्थानकापासून ते चार रस्त्यापर्यंत येथील रहिवाशांच्या अंगवळणी पडला आहे. असे जरी असले तरी संकुलात मात्र निरव शांतता अनुभवावयास मिळते, त्याचा आनंद येथील रहिवाशांना आहे.
समाजहिताची जपणूक
मंजुनाथ निवासी संकुलाच्या जागेचा काही भाग त्यावेळी नगर परिषदेला दवाखान्यासाठी देण्यात आला होता. राज्याचे तत्कालीन नगरविकास मंत्री हशू अडवाणी यांच्या हस्ते ऑगस्ट १९७८ मध्ये त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. अनेक वर्षे हा दवाखाना चालला, परंतु कालांतराने वैद्यकीय सेवा-सुविधा येथेही निर्माण झाल्याने हा दवाखाना बंद पडला. त्यानंतर नोव्हेंबर २००२ मध्ये येथे वाचनालय सुरू करण्यात आले. त्याला लागूनच एक गल्ली रस्ता गेला आहे. ती जागाही संकुलाची आहे. हा रस्ता पलीकडच्या टिळकनगर शाळेच्या रस्त्याला जोडला जातो. त्यामुळे शॉर्टकट म्हणून या रस्त्याचा वापर रहिवासी करीत आहेत. या रस्त्यावर उशिरापर्यंत वर्दळ सुरूअसल्याने रात्री घरी जाताना कोणतीही भीती वाटण्याचे कारण नाही. नाटककार राम बोरकर गल्ली म्हणून ती प्रसिद्ध आहे. या जागेबदल्यात इमारतीचा मजला वाढविण्याचा जादा एफएसआय जरी घेतला असला तरी संकुलाची ही जागा सार्वजनिक वापरासाठी देऊन समाजहित जपण्याचा प्रयत्नही बिल्डरने केला आहे.
वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम
मंजुनाथ संकुलाचा २६ जानेवारीला वर्धापन दिन असतो. सोसायटी स्थापन झाल्यापासून आजतागयत हा वर्धापन दिन मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. महापूजा, महाप्रसाद याचबरोबर विविध स्पर्धाची जत्राच जणू येथे असते. नृत्य, गीत गायनांचा समावेश असलेला सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत खुर्चीपासून, चित्रकला, वक्तृत्व, निबंध ते बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ बॉक्सटाइप क्रिकेट स्पर्धा महिनाभर येथे सुरू असतात. त्याचबरोबर वसाहतीतील गुणवंतांचा सत्कारही यानिमित्ताने केला जातो. संकुलात मोकळी जागा असल्याने त्याचा पुरेपूर वापर या कार्यक्रमासाठी अगदी नियोजितरीत्याकेला जातो. सोसायटी समितीच्या मार्गदर्शनाखाली तरुण मंडळी या कार्यक्रमांचे नियोजन करत असतात,अशी माहिती सक्रिय सभासद समीर सुर्वे यांनी दिली. वर्षभरात प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र दिन, होळी, दहीहंडी आदी मोजकेच सण, उत्सव साजरे केले जातात. परंतु ते साजरे करताना त्यांचा उत्साह हा द्विगुणीत असतो. मोठय़ा प्रमाणात या उत्साहात रहिवासी सामील होत असतात. गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी इमारतींच्या समोरील मार्गावरून विसर्जन मिरवणूक जात असल्याने मार्गावर भाविकांसाठी सरबत आणि रसपानाची व्यवस्था केली जाते. अजूनही ही परंपरा कायम जपली गेली आहे. तरुण आणि ज्येष्ठांचा या सत्कार्यात मोठा सहभाग असतो.
१९८४ लाच मानीव अभिहस्तांतर
सदनिकेचा ताबा मिळाल्यानंतर घर मालकीचे झाले, असा सर्वसाधारण रहिवाशांचा समज असतो. परंतु त्यांची मालकी ही चार भिंतींपुरती मर्यादित असते. मात्र इमारत ज्या जागेवर उभी असते, त्याची मालकी सोसायटीच्या नावावर होणे आवश्यक असते. त्यासाठी मानीव अभिहस्तांतर करावे लागते. हल्ली अनेक गृहनिर्माण संस्था मानीव अभिहस्तांतरासाठी प्रयत्न करीत आहेत. मंजुनाथ निवासी संकुलाचे अभिहस्तांतर मात्र १९८४ मध्येच झाले असल्याची माहिती समीर सुर्वे यांनी दिली.
ज्येष्ठांनाही येथे ‘स्पेस’
संकुलात वन रूम, टू बीचकेचे बांधकाम ११७७ मधील असल्याने अर्थातच चटईक्षेत्रही मनासारखे मिळाले आहे. त्यामुळे लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वांना एक चांगला ‘स्पेस’ मिळाला आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्यामुळे मोठाच दिलासा मिळाला आहे. इतरांच्या तुलनेत सोसायटीत मोठी जागा मिळाल्याने घरातील सर्व सदस्यांची सोय झाली अशी भावना ८१ वर्षांचे सोसायटीचे माजी अध्यक्ष एस.एच.नायक यांनी व्यक्त केली. मानवी संसाधन (एच.आर.) या विषयात त्रेचाळिसाव्या वर्षांत मुंबई विद्यापीठात प्रथम वर्गात, सर्वप्रथम येण्याचा मान नायक यांनी मिळविला आहे. नायक हे एलएल.बी.सुद्धा आहेत. एच.आर.चे प्रशिक्षण देण्याचे काम ते आजही करतात. ब्रिंग जॉय टू युवर लाइफ (जीवनात आनंद फुलवा) या पुस्तकांतून त्यांचे व्यावहारिक शहाणपण प्रतिबिंबित झाले आहे. त्या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद लवकरच पुस्तकरूपाने येत आहे, असे नायक यांनी यावेळी सांगितले. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या ‘विंग्ज ऑफ फायर’ या आत्मचरित्राचा अनुवाद करणाऱ्या साहित्यिका प्रा. माधुरी शानभाग यांनी नायक यांच्या पुस्तकाचा अनुवाद केला असून राजहंसतर्फे हे पुस्तक प्रसिद्ध होत आहे
सुविधा जेमतेम, तरीही समाधान
निवासी संकुल शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने रात्री उशिरापर्यंत वर्दळ सुरू असते. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडत नाही. संकुलाला एकच सुरक्षा रक्षक आहे. तर दोन सीसीटीव्ही संकुलातील हालचालींवर लक्ष ठेवतात. सोसायटीच्या कामकाजासाठी एक कार्यालय आहे. वर्धापन दिनी कॅरम, बुद्धिबळ आदी खेळांच्या स्पर्धासाठी या कार्यालयाचा वापर खुबीने केला जातो. दिवसातून दोन वेळा दोन ते अडीच तास पाणी असते. ते दिवसभरासाठी पुरेसे असते. दैनंदिन अन्नधान्याच्या गरजा, उत्सव खरेदीसाठी फार काही दूर जावे लागत नाही. सभोवतालीच प्रशस्त दुकाने असल्यामुळे मनसोक्त खरेदीचा आनंद रहिवाशांना घेता येतो. करमणुकीसाठी उद्याने आणि सिनेमागृहे त्याचबरोबर बँका, शाळा, रुग्णालये, दवाखाने, औषधांची दुकाने आदी वैद्यकीय सुविधाही परिसरातच आहेत. शहराच्या बाहेर जरी जायचे झाले तर रेल्वे, बस, एसटी, रिक्षा ही सार्वजनिक वाहने लागलीच उपलब्ध होतात. त्यामुळे संकुलात जरी फारशा काही सुविधा नसल्या तरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने रहिवासी समाधानी आहेत.