ठाणे : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची मंगळवारी गडकरी रंगायतन येथे सभा होणार आहे. या सभेपूर्वी माजिवडा ते महापालिका मुख्यालय अशी दुचाकी मिरवणुक निघणार आहे. यादरम्यान, नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, असा दावा सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाने केला आहे.
सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यात सभेच्या नियोजनाची माहिती दिली. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला २४ डिसेंबर पर्यंतची मुदत जरांगे पाटील यांनी दिली आहे. तोपर्यंत राज्यभर फिरुन सभा घेण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. त्यानुसार येत्या मंगळवारी ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. माजिवडा जुना टोल नाक्या पासून ते महापालिका मुख्यालय अशी दुचाकी मिरवणुक निघणार आहे. त्यांची सभा मंगळवारी सकाळी १० वाजता गडकरी रंगायतन येथे होणार आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाचे पदाधिकारी रमेश आंब्रे यांनी दिली.