मीरा रोड येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी मनोज साने याने सरस्वती वैद्य यांच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे केले. त्यानंतर विल्हेवाट लावण्यासाठी कुकरमध्ये शिजवल्याची थरकाप उडवणारी घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस तपासात आता नवीन माहिती समोर येत आहे.
नेमकं प्रकरण काय?
मीरा रोडच्या गीतनगर परिसरात गीता दिप या इमारतीच्या ७ व्या मजल्यावर मनोज साने (५६) आणि सरस्वती वैद्य (३२) हे दोघे मागील तीन वर्षापासून भाड्याच्या सदनिकेत राहत होते. पण, ३ जूनच्या मध्यरात्री मनोजने सरस्वतीची हत्या केली आणि ४ जूनच्या पहाटेपासून पुढले ४ दिवस तो मृतदेहाचे तुकडे करत होता.
हेही वाचा : सरस्वती आणि मनोज एकमेकांच्या आयुष्यात कसे आले? हत्याकांडापर्यंत काय घडलं?
विल्हेवाट लावण्यापूर्वी हाडे आणि मांस वेगळे करण्यासाठी तो एकेक अवयव कुकरमध्ये शिजवत होता. कुकर, ३ पातेली आणि २ बादल्यांमध्ये मृतदेहाचे असंख्य तुकडे पोलिसांना आढळले आहेत. पोलिसांनी आरोपी मनोजला ७ जूनला अटक केली आहे. त्याला न्यायालयाने १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
“ती तर माझ्या मुलीसारखी”
पोलीस तपासात मनोज सानेने धक्कादायक खुलासे केले आहेत. “तो एचआयव्ही संसर्गित आहे. त्याच्यात आणि सरस्वतीमध्ये कधीही शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नाहीत. कारण, सरस्वती ही तर त्याच्या मुलीसारखी होती,” असा दावा मनोजने चौकशीत केल्याचं पोलीस अधिकाऱ्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितलं.
हेही वाचा : किचन मध्ये मृतदेह शिजवायचा आणि जेवायला बाहेर जायचा; मनोज सानेचे अंगावर शहारे आणणारे क्रौर्य
२०१४ साली ओळख अन्…
मनोज साने हा बोरीवलीत शिधावाटप केंद्र चालवत होता. २०१४ साली सरस्वती वैद्यशी मनोजची ओळख झाली. तर, सरस्वती ही अनाथ होती. या ओळखीचं प्रेमात रुपांतर झाले. मागील आठ वर्षापासून दोघे मीरा रोड येथे राहण्यास होते. तर, खून झाला त्या घरात गेली तीन वर्ष दोघेही राहत होते.