ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या वागळे इस्टेट भागातून पाचवेळा काँग्रेस पक्षातून नगरसेवक म्हणून निवडून आलेले आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात दोनदा विधानसभेची निवडणूक लढलेले मनोज शिंदे यांनी नुकताच शिंदेच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचे कट्टर विरोधक असलेले मनोज शिंदे हे त्यांचे कट्टर समर्थक कसे बनले, याविषयी आता वेगवेगळ्या चर्चा रंगल्या असून काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी कोकण विभागाकडे केलेल्या दुर्लक्षितपणामुळेच हा निर्णय घेतल्याचे खुद्द मनोज यांनी स्पष्ट केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसर हा कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदार संघात येतो. या मतदार संघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चौथ्यांदा निवडून आले आहेत. हा परिसर त्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या भागातून शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतात. शिवसेनेतील बंडानंतर या सर्वच नगरसेवकांनी शिंदे यांना समर्थन दिले आहे. हा परिसर मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असला तरी या भागातून काँग्रेसचे माजी नेते मनोज शिंदे हे पाच वेळा निवडून आले आहेत. १९९१ पासून मनोज शिंदे हे महापालिकेत निवडुन येत असून ते पालिकेत विरोधी पक्ष नेतेही होते. ठाणे शहरातील काँग्रेसचा चेहरा म्हणून त्यांची ओळख होती. २०१४ नंतर ठाणे शहरात काँग्रेस पक्षाची वाताहात झाली. या काळातही मनोज यांनी वागळे इस्टेट भागातून आपले पॅनल निवडून आणले होते. २०१७ च्या निवडणूकीत मात्र त्यांचा पराभव झाला. मनोज हे मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात २००९ मध्ये विधानसभेची निवडून लढले होते आणि त्यावेळेस ४० हजार मते घेतली होती. या निवडणूकीत त्यांचा ३२ हजार मतांनी पराभव झाला होता.

आणखी वाचा-राजन विचारेंची केवळ राबोडीत तर, संजय केळकरांची संपुर्ण ठाण्यात गाडी सुसाट

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात भिवंडीची हक्काची जागा काँग्रेसने राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाला दिली. यानंतर विधानसभा निवडणुकीतही कोकण पट्टयात महाविकास आघाडीमुळे काँग्रेस पक्षाला हक्काच्या जागा सोडाव्या लागल्या. यामुळेच नाराज झालेल्या मनोज यांनी बंडखोरी करत मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढविली. त्यात त्यांचा पराभव झाला. बंडखोरी केल्यामुळे त्यांना पक्षातून सहा वर्षांपासून निलंबित करण्यात आले होते. परंतु भिवंडी पश्चिमेत काँग्रेस उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्यांविरोधात मित्र पक्षांनी कोणतीच कारवाई केलेली नाही. यामुळेच नाराज झालेले मनोज शिंदे यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिंदेच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांचे कट्टर विरोधक ते समर्थक असा मनोज यांचा राजकीय प्रवास झाल्याचे दिसून येत आहे.

आणखी वाचा-ठाणे जिल्हा गारेगार! बदलापुरात सर्वात कमी तापमानाची नोंद

काँग्रेस पक्षातील अनेक कर्तुत्वान नेते सोडून गेले. यानंतरही आम्ही पक्षाचे काम करित राहिलो. परंतु कोकण पट्ट्याकडे पक्षाच्या नेत्यांनी दुर्लक्ष केले. भिवंडी पश्चिमेत काँग्रेस उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्यांविरोधात मित्र पक्षांनी कोणतीच कारवाई केलेली नाही. परंतु पक्षाने मात्र माझ्यावर पहिली कारवाई केली. यासंबंधीचे पत्र पक्षाच्या नेत्यांना पाठविले पण, त्याचीही दखल नेत्यांनी घेतली नाही. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षात अनेक विकासकामे केली. अशा कर्तुत्वान मुख्यमंत्री शिंदे यांना साथ देणे गरजेचे असल्यामुळे मी त्यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया मनोज शिंदे यांनी ‘लोकसत्ता’ शी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj shinde reaction on leaving congress and joing shivsena shinde group mrj