डोंबिवली : डोंबिवलीतील सागाव येथील गुंड वैभव जयवंत पाटील यांना कल्याणच्या पोलीस उपायुक्तांनी एक वर्षासाठी ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. हा हद्दपारीचा आदेश मोडून वैभव पाटील हे आपल्या डोंबिवलीतील सागाव येथील घरी वास्तव्यास आहेत अशी माहिती मिळाल्यावर मानपाडा पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री वैभवच्या घरावर छापा टाकून त्यांना अटक केली.
वैभव पाटील हे डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील सागाव येथील शंकेश्वर मंदिरा समोरील साई प्रसाद बंगला येथे राहतात. ते पोलिसांच्या अभिलेखावरील गु्न्हेगार आहेत. त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेऊन कल्याणच्या पोलीस उपायुक्तांनी त्यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ठाणे, रायगड जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. या हद्दपारीच्या काळात वैभव यांनी ठाणे, रायगड जिल्ह्यांच्या बाहेरील प्रांतात राहणे अपेक्षित असते. वैभव यांनी हद्दपारीचा आदेश मोडून पोलिसांना अंधारात ठेऊन ते गुपचूप डोंबिवलीत सागाव येथील घरी आला होते.
मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांना ही गुप्त माहिती मिळाल्यावर त्यांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक संपत फडोळ आणि पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. सोमवारी मध्यरात्री साहाय्यक पोलीस निरीक्षक फडोळ यांना वैभव पाटील हा त्यांच्या साई प्रसाद बंगला येथील घरी आला आहे याची खात्री पटली. त्यानंतर पोलीस पथकाने मध्यरात्री अडीच वाजण्याच्या दरम्यान वैभव पाटीलच्या घरी छापा टाकला. दरवाजा उघडल्यानंतर वैभव पोलिसांच्या टप्प्यात आला. न्यायालय, पोलिसांची परवानगी घेऊन आपण हद्दपारी आदेश मोडून डोंबिवलीत आला आहात का. यासंदर्भातचे कागदपत्र आपणाकडे आहात का असे प्रश्न फडोळ यांनी वैभव यांना केली. तो पोलिसांना उत्तरे देऊ शकला नाही. हद्दपारी आदेश मोडून वैभव डोंबिवलीत आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्यावर हवालदार संजू मासाळ यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण, डोंबिवली परिसरातून गेल्या वर्षभरात सहा ते सात जणांना तडीपार करण्यात आले आहे. कल्याण पूर्वेतील बालिकेचा मारेकरी विशाल गवळीच्या तीन गुन्हेगारांना गेल्या वर्षी ठाणे, रायगड, मुंबई जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. कल्याण डोंबिवली शहरे नशामुक्त आणि गुन्हेगारी मुक्त करण्याचे अभियान पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सुरू केले आहे. उपायुक्त झेंडे यांच्या गुन्हेगारी कमी करण्याच्या कठोर, आक्रमक विविध उपक्रमांमुळे शहरातील गुन्हेगारी घटली आहे. रात्रीच्या वेळेत शहरात, निर्जन ठिकाणी मोकाट फिरणाऱ्या टोळ्यांना आवर बसला आहे.