ठाणे : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यात मुख्य तसेच अंतर्गत मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. ठाणे शहरात काही सखल भागात पाणी साचले होते. तसेच तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्यात आलेले खड्डे पुन्हा पडल्याने कोंडीत भर पडली. वाहतूक कोंडीमुळे नोकरदारांचे हाल झाले.
जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे ठाण्यात काही सखल भागात पाणी साचले होते. पादचाऱ्यांचे तसेच परिसरातील नागरिकांचे हाल झाले. दुपारी पावसाने काहीशी उसंत घेतल्यानंतर सायंकाळी पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शहरातील मुख्य मार्ग, महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. मुंबई नाशिक महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घोडबंदर मार्गावरही वाहतूक कोंडी झाली होती.
घोडबंदर मार्गावर कासारवडवली, वाघबीळ भागात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचेही या मार्गावर काम सुरू आहे. त्यामुळे मार्गावरोधकांमुळे कोंडीत भर पडत होती. भिवंडी शहरातही रस्त्यांची दैना झाली आहे. रस्त्यावर चिखल आणि खड्डे यामुळे दापोडे, अंजूरफाटा भागात वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे कामाहून घरी परतणाऱ्या नोकरदारांचे हाल झाले. डोंबिवली, कल्याण आणि बदलापूर भागातही पावसाचा जोर कायम होता.
वीजपुरवठा खंडित
ठाण्यातील नौपाडा, गोखले रोड, तीन हात नाका, कोलशेत, ढोकाळी, रघुनाथ नगर, घोडबंदर तसेच काही भागात रात्री विद्युतपुरवठा खंडित झाला होता. शहरातील सिग्नल यंत्रणा बंद पडली होती. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. रस्त्यावरील पथदिवे बंद होते. त्यामुळे सर्वत्र काळोख पडला होता.