भगवान मंडलिक, लोकसत्ता
कल्याण : देशविदेशातील ‘ब्रॅण्डेड’ कपडय़ांच्या खरेदीसाठी ग्राहकवर्ग मॉलची वाट धरतो. मात्र, झगमगाटी शोरूममध्ये आकर्षक वाटणारे कपडे भिवंडीतील एका गावाच्या कुशीत तयार होत असल्याचे अनेकांना माहिती नसते. ठाणे जिल्ह्यातील कोन येथे कपडे शिवण्याचे मोठमोठे कारखाने असून येथून कपडय़ांची निर्यातही केली जाऊ लागली आहे.
भिवंडी-कल्याण मार्गावरील अस्मिता टेक्स्टाइल्स पार्कमध्ये नामांकित नाममुद्रा असलेल्या कंपन्यांचे कपडे तयार होतात. मुंबईतील एक हजार फुटाच्या जागांऐवजी कोनमधील ५० हजार ते एक लाख चौरस फुटांच्या जागा व्यावसायिकांना कमी दरात उपलब्ध होतात. याशिवाय स्वस्तात मजूर, ग्रामपंचायत असल्याने करांचा बोजाही कमी आहे. अत्याधुनिक वस्त्रे तयार करणारी शिलाई यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे उपलब्ध मजुरांमध्ये अधिकचे उत्पादन घेता येते. या केंद्रामुळे भिवंडी, कल्पाण, शहापूर, मुरबाड येथील ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आजघडीला येथे २७ हजारहून अधिक कामगार आहेत.
हेही वाचा >>> डोंबिवली : खाडीतील बेपत्ता बाप लेकांचा शोध सुरूच
जगभरातील ब्रॅण्डचे ‘हब’
येथील कपडय़ांचे दर इतर बाजारपेठांपेक्षा कमी आहेत. गुजरात, कोलकाता, सुरतसह अन्य राज्यांतील व्यापारी येथून कपडे उचलण्यास प्राधान्य देतात. देशभरातील मॉल्समध्ये अस्मिता टेक्सटाइल्स पार्कमधून कपडय़ांचा पुरवठा होत आहे. लुई फिलीप, अॅरो, फ्लाईंग मशीन, फोबो, कॉटनकिंग, लिव्हाईज, पेपे अशा अनेक प्रसिद्ध नाममुद्रा असलेल्या कंपन्या येथून कपडे शिवून घेत आहेत. या कारखान्यांच्या परिसरात खाणावळी, उपाहारगृहे, मालवाहतूक, हमाल, कामगार पुरवठा असे या अनेक पूरक उद्योगही उभे राहिले आहेत.
वाहतुकीसाठी सोयीचे ठिकाण
हे ठिकाण शहराच्या वर्दळीपासून दूर असल्याने वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत नाही. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-कल्याण-मुरबाड-अहमदनगर, मुंबई-अहमदाबाद, मुंबई-गोवा महामार्ग येथून जवळ असल्याने हे केंद्र सोयीस्कर आहे. निर्यात करण्यासाठी मुंबई विमानतळ, येत्या काळात नवी मुंबईचे विमानतळही फारसे दूर नसेल.
मुंबईतील बहुतांश तयार कपडयांचे व्यवसाय भिवंडीकडे सरकत आहेत. तयार कपडय़ांबरोबर रोजगाराचे नवे केंद्र तयार होत आहे. वाहतूक, स्वस्ताई यामुळे या केंद्राला राज्यातील व्यावसायिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
– विश्वनाथ डामरे,
अध्यक्ष, गारमेंट कामगार सेना
तयार कपडयांच्या व्यवसायामुळे या भागातील बेरोजगारांना अधिक प्रमाणात काम मिळाले. घरगुती उद्योगांना चालना मिळाली आहे. स्थानिक प्रशासकीय संस्थांना चांगला महसूल या यंत्रणेतून मिळत आहे.
– रवीश धुरू,
वास्तुविशारद, भिवंडी