बाजीराव-मस्तानी चित्रपट बनवताना बाजीराव पेशव्यांची आई, पत्नी, मुलगा यांच्यासारख्या अनेकांच्या चरित्रावर अन्यायच झाला आहे. त्यामुळे अशा ऐतिहासिक भूमिका साकारण्याच्या प्रक्रियेत संबंधितांनी भान ठेवणे जरुरीचे ठरते, असे परखड मत ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे यांनी ठाण्यात केले. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत ‘अजिंक्य योद्धा बाजीराव’ या विषयावर बोलताना त्यांनी हा पंचनामा केला. इतिहासाच्या प्राध्यापिका वर्षां मुळे अध्यक्षस्थानी होत्या. शंभर कोटी खर्च करून हा चित्रपट काढण्यात आला. त्याबद्दल संबंधितांना धन्यवादच दिले पाहिजेत. परंतु ऐतिहासिक सिनेमातील नायक, खलनायकांच्या भोवती रचना करताना त्यांच्यावर अन्याय तर होतोच. शिवाय दुर्दैवाने हाच सत्य इतिहास असल्याची समाजाची भावना होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
बाजीराव पेशवे हे अत्यंत हुशार होते. शिवछत्रपतीं प्रमाणेच त्यांनी घोडदलांचा अभिनव ‘गनिमी कावा’ विकसित केला. गुप्तहेरांकडून शत्रूबद्दल बारीकसारीक माहिती काढून त्यांची प्रथम रसद तोडण्याचे काम केले व नंतर छापे टाकून त्याना निष्प्रभ केले. त्यांची प्रतिमा ‘अजिंक्य योद्धा’ अशी असून ती प्रेरणा देणारी आहे, असे त्यांनी सांगितले.

Story img Loader