डेबिट कार्ड हरविल्यानंतर एका शिक्षकाच्या खात्यातून ६ लाख १५ हजार रुपये गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही रक्कम एका भामट्याने काढून घेतली असून याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फसवणूक झालेले ५२ वर्षीय शिक्षक कळवा खारेगाव भागात राहतात. त्यांनी एक ते राहत असलेल्या इमारतीमध्ये एक सदनिका खरेदी केली होती. काही दिवसांपूर्वीच त्यासाठी त्यांनी बँकेतून ७ लाख रुपयांचे कर्ज काढले होते. त्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात आली होती. रविवारी घरामध्ये असताना त्यांनी बँक खात्यातील रक्कम तपासली असता, त्यामधून ६ लाख १५ हजार रुपये गायब असल्याचे समोर आले.
हेही वाचा: कल्याण: ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ लोंबकळणाऱ्या केबल वाहिनी जवळूनच प्रवाशांची ये-जा
त्यांनी बँकेत याबाबत संपर्क साधला असता, त्यांच्या डेबिट कार्डमधून ही रक्कम काढण्यात आल्याची माहिती त्यांना प्राप्त झाली. त्यानंतर त्यांनी घरामध्ये डेबिट कार्ड शोधला असता, ते कार्ड त्यांना आढळून आला नाही. कार्ड चोरून परवलीचा अंक कोणतरी प्राप्त करून ही रक्कम काढल्याचे लक्षात आल्यानंतर सोमवारी त्यांनी याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.