शहरात अनेक लोकप्रिय मालिकांचे चित्रीकरण
चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणासाठी अजूनही मोठय़ा प्रमाणात मायानगरी मुंबईलाच पसंती दिली जात असली, तरी गेल्या काही वर्षांत शेजारील ठाण्यातही अनेक मालिकांचे चित्रीकरण होऊ लागले आहे. रवी जाधव यांच्या ‘टाइमपास’ आणि ‘बालक पालक’ या दोन सिनेमांमधून मोठय़ा पडद्यावर बाह्य़ चित्रीकरणात ठाणे शहराचे दर्शन घडले. तेव्हापासून अनेक निर्माता, दिग्दर्शकांनी चित्रीकरणासाठी मुंबईऐवजी ठाण्याला पसंती देण्यात सुरुवात केली. सध्या माझ्या नवऱ्याची बायको, जागो मोहन प्यारे, बापमाणूस, फुलपाखरू, घाडगे अॅन्ड सन्स या मालिकांचे चित्रीकरण ठाण्यात सुरू आहे. त्याचबरोबर ‘गुलमोहर’ या मालिकेच्या काही भागांचेही चित्रीकरण ठाण्यात झाले आहे.
ठाणे शहरात जुन्या चाळी, वाडे आहेत. त्याचप्रमाणे नव्या महानगरीय संस्कृतीचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या गगनचुंबी इमारती आहेत. शहरातील तलावांमुळे बाह्य़ चित्रीकरणाला वेगळी शोभा येते. मालिकांमधील बहुतेक कलावंत मुंबई, पुणे, नाशिक, कल्याण-डोंबिवली परिसरात राहतात. ठाणे त्यांच्यासाठी मध्यवर्ती पडते. शिवाय मुंबईच्या तुलनेत ठाण्यात चित्रीकरणासाठी लागणाऱ्या परवानग्या विनासायास मिळतात. त्यासाठी फारशी दगदग करावी लागत नाही, असे संबंधितांचे म्हणणे आहे.
मराठी सिनेमांना नवा लूक देणाऱ्या दिग्दर्शकांच्या पिढीपैकी एक मानले जाणारे रवी जाधव ठाण्यात राहतात. त्यांनी त्यांच्या गाजलेल्या सिनेमांचे चित्रीकरण ठाण्यात करणे पसंत केले. त्यापाठोपाठ ‘काहे दिया परदेस’, ‘होणार सून मी या घरची’ यांसारख्या मालिकांचे चित्रीकरणही ठाण्यात झाले. विशेषत: नव्या ठाण्यात घोडबंदर रोड परिसरात मोठय़ा प्रमाणात चित्रीकरण सुरू आहे.
चित्रीकरणाची महत्त्वाची ठिकाणे
गडकरी रंगायतन परिसर, मासुंदा तलाव, उपवन तलाव, मॉल, वसंत विहार परिसर, अद्ययावत संकुले, उड्डाणपूल.
आपली कलाकृती वेगळी दिसावी म्हणून दिग्दर्शक चित्रीकरणासाठी नव्या जागांच्या शोधात असतात. ठाणे शहर परिसरात अशा अनेक जागा आहेत. ठाण्यात हिरवाई आहे. खाडी किनारा आहे. उत्तम संकुले आहेत. तलाव, मॉल, उड्डाणपूल आहेत. शिवाय येथील स्थानिक प्रशासन चित्रीकरणासाठी उत्तम सहकार्य करते. सध्या माझ्या एका सिनेमाचे चित्रीकरण ठाणे शहरातच सुरू आहे.
– विजू माने, दिग्दर्शक